Thursday, June 30, 2022

आई मायेचं कवच

             आई मायेचं कवच

गर्भापासून सांभाळते असो तो किंवा ती

बापाला अंकूर दिसतो असो दिवा की पणती

सुसंस्कारित घडावीत मूलं यासाठीच ती झटते

आई मुलांसाठी मायेचं कवच असते.     //धृ//

जीवापाड जपलेली पिल्लं जेव्हा मोठी होताना पाहते

फुलपाखरी जीवन पाहून आतून ती घाबरते

निसरड्या वळणावरून सावरण्यासाठी धडपडते

आई... मुलांसाठी मायेचं कवच असते.       //१//

मुलांसाठी राबणाऱ्या बापाला पाहून कळवळते

अख्खा भार संसाराचा ती त्यांच्यासोबत उचलते

कष्टणार्या बापाची जाणीव ठेवा म्हणून सांगते

आई मुलांसाठी मायेचं कवच असते.           //२//

भपक्या भडक दुनियेत जेव्हा मूलं अडकलेली पाहते

पायाखालची जमीन तेव्हा सरकन सरकून जाते

पडते रडते धडपडते पण लेकरांना समजवण्याचा प्रयत्न करते

आई मुलांसाठी मायेचं कवच असते.          //३//

मुलांशी मैत्री करणं आईला खूपच आवडते

बापानेही मूक्त वागावं, एवढीच अपेक्षा करते

हट्टी बंडखोर मुलं जेव्हा ती पाहते

आतून बिच्चारी तीळ तीळ तुटलेली असते //४//

शिकून मुलं मोठी व्हावीत एवढीच अपेक्षा ती करते

दळभद्री गरीबीला ती मुलांपासून लपवते

खरंच आई चुकते कारण ती मायेचं कवच असते. //५//

लेकरांचा पडलेला चेहरा बघून कासावीस होते

त्यांना काही दुखलं खूपलं का हे आतुरतेने विचारते

काय कमी पडतंय याच गोंधळात ती जगते

खरंच आई मुलांसाठी मायेचं कवच असते  //६//

लेकीचा उतरलेला चेहरा पाहून आतून कोसळते

लेकीच्या डोळ्यातलं पाणी तिचं काळीज पिळवटून टाकते

सर्वांनी सूखात मजेत रहावं एवढीच अपेक्षा करते

आई मुलांसाठी मायेचं कवच असते //७//

विव्हळणार्या नवर्या कडे रितसर दुर्लक्ष करते

त्याच्या व्यथा आणि जखमा पाहून ती तळमळते

लेकरांच्या सुखासाठीच आईबापाची ही अवस्था होते

तरीही आई मुलांसाठी मायेचं कवच असते. //८//

मन मारून कित्येकदा ती कुटूंबासाठी खपते

प्रत्येकाच्या आवडीनिवडी मनापासून जपते

अजाण या लेकरांना याची जाणीवच नसते

खरंच आई मुलांसाठी मायेचं कवच असते.    //९//

उनाड वय समजून लेकरांना समजून घेते

त्यांच्या कठोर वाणीने घायाळ, हरिणी ती होते

कर्तव्य आणि माया या बंधनात ती अडकते

खरंच आई मुलांसाठी मायेचं कवच असते.  //१०//

सौ.मनिषा पिंटू वराळे धरणगुत्ती तालुका शिरोळ जिल्हा कोल्हापूर


1 comment:

  1. ताई, खूप सुंदर शब्दांकन ...

    ReplyDelete