Saturday, August 29, 2020

असहाय्यता कर्तव्य निभावताना

           असहाय्यता कर्तव्य निभावताना


घरची वडिलधारी व्यक्ती आधार असतो कुटूंबाचा

पण कोरोना आला आणि विभक्त ठेवला पसारा बापाचा

एकत्र कुटुंब असुनही तो अनुभव घेतो एकटेपणाचा

किती मी लाचार झालोय उपचार करताना बापाचा

बापाला मी दुरुन विचारतो, औषधपाणी घेतलंय का

आईला मी सांगून बघतो वेळेवर बाप जेवतोय का

बापाचा पडलेला चेहरा......पोटात कालवाकालव करतोय

असा कसा हा कोरोना भरल्या घरात बापाला एकटा ठेवतोय

बाप पोटभर जेवतोय काय याचाच विचार डोक्यात असतोय

बापाचं असणं महत्त्वाचं म्हणून सारा आटापिटा करतोय

चिल्लीपिल्ली उपाशी राहू नयेत म्हणून मी राबराब राबतोय

घरी आल्यावर समाधानी चेहरे मनात साठवून ठेवतोय

कोरोना......तू नाती, माणसं सारंच दूर का रे करतोय

कसा घालू ताळमेळ याच विचारात मनिषा जगतोय

याच विचारात मनिषा जगतोय.

         सौ.मनीषा पिंटू वराळे धरणगुत्ती

Friday, August 28, 2020

आज तिचा वाढदिवस

                      आज तिचा वाढदिवस


होय! आज मनापासून व्यक्त व्हावंसं वाटतं कारण, अगदी नकळत्या वयात जिच्यात जीव गुंतला होता त्या माझ्या प्रिय सखीचा आज वाढदिवस आहे.तसा तिचा माझा संपर्क माझ्या लग्नानंतर कमीच झाला होता.पण...मनाने मात्र ती नेहमीच माझ्या सोबत आहे.ती शिकून नोकरीला लागली.जणू,नव्या पिढीवर संस्कारांचे मोती पेरतीय.आणि स्वावलंबी बनण्याचा अम्रुत वसा देतीय.संसारवेलीवर उमललेल्या श्री वर ती व्यवहार कुशल कसं जगायचं याचे संस्कार देतीय.जीव लावून झूरत बसण्यापेक्षा शिकून स्वावलंबी होण्याला महत्व देतीय.तिच्या लाघवी बोलण्याने ती सर्वांना जिंकत असेल यात तीळमात्र शंका नाही.पण........

ती मैत्रीणींशी बोलायचा कंटाळा का करते हेच मला समजत नाही, किंवा कदाचित असंही असेल की तिला माझ्यासारख्या निकामी मैत्रीणी सोबत बोलताना कसनुसं वाटत असेल.पण मन सांगतं की नाही माझी सखी असा विचार नाही करणार.,...,

तिला तिच्या बरोबरीच्या मैत्रिणी तर आवडत नसतील? जाऊ दे, उगीच मनात विचारांचे काहूर मांडण्यापेक्षा एक गोष्ट महत्त्वाची वाटते ती म्हणजे......... आयुष्याच्या मध्यावर पोचून सुध्दा तिच्यासाठीची ओढ कणभरही कमी झालेली नाही.

  आजही ती तेवढीच हक्काची वाटते.आजही ती भासात,श्वासात सोबतीला असते.आजही आपण तिच्याशी मनसोक्त गप्पा मारत असतो.तेही मनातल्या मनात! तिची आठवण सुद्धा एक प्रकारचं समाधान असते.तिच्यासाठी काय करू अन् काय नको असं वाटतं.तरीही.....मनाच्या गाभाऱ्यात ती रानी बनून राज्य करते माझ्या मनावर आणि तरीही आसूसलेली माझी नजर बघुन माझ्या सावल्या ( माझ्या मुली) मला चिडवतात की,तू आज कित्ती खूश आहेस ग! 😍 आणि त्या खळखळून हसतात आणि या हास्याचे निमित्त असणारी ती आतून खूप सुखावते.

           माहीत नाही तिची माझी भेट होईल की नाही, माहीत नाही तिला माझ्या भावना कळतील की नाही आणि ती मला समजून घेईल की नाही, पण.... खरं सांगायचं तर तिच्या असण्याचा भासच माझ्या जगण्याला उभारी देतो हे ही नसे थोडके नाही का?....

               शेवटी मैत्री म्हणजे असतं तरी काय.......एक निखळ हास्य, एक सुखदू:खाचा संवाद, एक मैत्रीचा हात जो थकल्या वेळी आधार देणारा, डोळ्यातील आसवं पुसणारा आणि पुन्हा नव्या उमेदीने प्रवास सुरू करणारा आशेचा हात, दुसरं काय? 

                ती आजही तशीच हसते.तिचे ते भावविभोरी डोळे पाहून आजही दिल खल्लास होतो.आजही वाटतं, ती तशीच धावत येईल.मला आलिंगन देऊन पुन्हा एकदा मला ध्येयवेडी झेप घेण्याचं बळ देईल.माझी सखी फक्त माझ्यासाठी पुन्हा एकदा नक्की येईल................ होय ना!

सौ.मनिषा पिंटू वराळे धरणगुत्ती

Tuesday, August 25, 2020

सच्चा सेवाभावी डॉक्टर

                   

           👩‍⚕️   सच्चा सेवाभावी डॉक्टर👩‍⚕️


 खरंतर वैद्यकीय क्षेत्र करियर म्हणून निवडताना मनात सेवाभावी  वृत्ती असावी लागते  . खूप सारा  संयम असावा लागतो, आणि कष्ट मेहनत खूप करावी लागते.  काहीजण फक्त पैसा आणि प्रतिष्ठा मिळावी . यासाठी  या क्षेत्रात येतात. पण डॉ. कुलभूषण चौगुले . एक  अभ्यासू आणि चिकीत्सक हुशार मनमिळाऊ स्वभावाने.  धरणगुत्ती सारख्या खेड्या गावात स्वत:च छोटंसं उपचार  केंद्र काढून मनोभावे सेवा बजावत आहेत.


       कधीही मदत मागा  हे  डॉक्टर तत्पर असतात.  फी चा विचार नंतर करतील पण रोगी बरा व्हावा. यासाठी धडपडत राहतील. अचूक निदान करून अनेकांचे जीव वाचवलेत. कितीदा तरी स्वत: च्या उपचारापलिकडे  पाहून दुसरीकडे रेफर   करून जीवदान दिले आहे.   रुग्णांचा   आर्थिक  छळवाद होऊ नये , म्हणून  शिरोळ सारख्या ठिकाणी मित्रांसोबत  शतायुषी नावाचे अद्ययावत यंत्रसामग्री असणारे भव्य हॉस्पिटल उभारून  रूग्णसेवा बजावत आहेत. खरंतर मला  सांगायला खूप आनंद होतो की दवाखान्याचे नाव शतायुष ___  म्हणजे  शत 100  वर्ष आयुष्य किती समर्पक नाव जणू  इथं जाणार प्रत्येक  रूग्ण 100वर्ष जगावा ही प्रामाणिक अपेक्षा . आणि डॉ नावाप्रमाणेच भूषण आहेत. यात शंकाच नाही . आज मनापासून  आभार मानावे वाटले.  यासाठीच हा  शब्द प्रपंच . तुमच्या  पुढील  वाटचालीस आभाळाभर सदिच्छा.  अशीच  मनिषाची इच्छा.... अशीच मनिषाची इच्छा.....

         सौ. मनिषा पिंटू वराळे. धरणगुत्ती.

Sunday, August 23, 2020

एक कर्ता पुरुष

                             एक कर्ता पुरुष

मग तो आई वडिलांचा मुलगा असो किंवा बायकोचा नवरा असो किंवा मूलांचा बाप असो तो कुटुंबासाठी तो करता पुरुष असतो.  ऊन वारा पाऊस सारं काही सोसतो. काम असू दे किंवा नसू दे तो घरच्यांना दोन वेळचे खाऊ घालत यावे, म्हणून काहीही करत असतो. पण त्याला समजून मात्र कुणीच घेत नसते.

    कितीही बंधनं आली कुचंबणा झाली . तरी तो आई बापाच्या सेवेसाठी सदैव तत्पर असतो. तरीही तो कमीच पडतो आणि शिवाय जिव्हारी  बोलण्याच्या त्यांच्या वाट्याला काहीच येत नसतं.


        तीच अवस्था एक नवरा म्हणून जगताना सुध्दा होत असते.  बायकोच्या अपेक्षा पुरवता येत नाही म्हणून आलेलं खजीलपणा . बायकोनं हसतमूखाने स्वागत करावं तीनं प्रसन्न रहावं . ही अपेक्षा असतानाच तिची होणारी कुचंबणा समजून ही न समजल्यासारखं वागणं हे वाटतं तितकं सोपं नसतं. अशा वेळी गप्प राहण्यापलिकडे  पर्याय च नसतो. ती थोडं फार    जाणून सहकार्य करते. एवढीच समाधानाची बाब  असते.


  आणि मूलांचं म्हणावं तर किती विचार करावा. त्यांच्या हट्टाला    मर्यादा नसतेच पण समजूदारपणाही नसतो.  तेव्हा  हतबल झालेला बाप जास्तीत जास्त वेळ घराबाहेर च राहत असतो.  मुलांच्या  आवडीनिवडी जपत असताना  त्यांच्या वाढलेल्या अपेक्षा आणि हट्टवादी पणा  यावर  काहीच  तर पर्याय नसतो.  कधी कधी तर एक एक वस्तू मायेनी आणून सजवलेली असते आणि मूलं रागात तिचा चक्काचूर करतात.  तेव्हा डोळ्यात पाणी आल्यावाचून राहत नाही.


        कर्म कर फल की इच्छा न कर या उक्तीप्रमाणे  ऊठल्यापासून  रात्री झोपेपर्यंत फक्त कामाचं  ओझं  पाठीवर घेऊन घूसमटणार्या मनाला  सावरत  प्रत्येकाला समाधान आणि आनंद   वाटण्याच्या नादात   स्वत:  मात्र तीळ तीळ तुटत असतो. आणि त्यांच्या या वेदनेवर हळूवार फुंकर सुध्दा  मारता येऊ नये . या हतबल तेने आतल्या आत   तुटणारी त्याची अर्धांगिनी कुणालाच समजत नसते . 


 शेवटी  काय जीवन जितकं सुंदर आहे. तितकंच कठोर  आणि  कठीण परिस्थितीत परिक्षा घेणारे सुध्दा आहे. म्हणून अशा कर्त्या पुरुषाला माझा मनापासून सलाम..... तुम्ही खरंच खूप ग्रेट आहात...

सौ . मनिषा वराळे धरणगुत्ती . 


    





Friday, August 21, 2020

निसर्ग

                       🌄🌲🌲     निसर्ग 🌄🌲🌲


                  फूल पानं वेलींनी बहरलेली

     कोवळी ही सृष्टी आनंदाने भरलेली


         हिरवीगार शालू नेसून राहिलेली

    गर्व शांत हवेच्या गारव्याने शहारलेली

  खरं तर ही किमया निसर्गानेच केलेली


                   कारण... झाडाविना पाऊस नाही वेलीविना फूल

  स्वप्नांचा रमला सजावा जशी नववधू सजावी


 निसर्गाच्या सोबतीने जीवनात सूखं यावी

 अशी किमया फक्त निसर्गानेच करावी.

 सौ. मनिषा वराळे धरणगुत्ती.


लेक वाचवा

 

                 लेक वाचवा

वंशाला दिवा हवा म्हणून पणतीच्या का करावा हेवा

उजेडासाठी तर पणतीचा उपयोग व्हावा

       मग का तिचा गर्भ पोटातच खुडावा

      ती होती म्हणून आजी मिळाली

स्री होती म्हणूनच आईपण अनुभवली


            ती होती म्हणून बहिणीची माया मिळाली

            ती होती म्हणूनच जीवन संगिनी झाली

 ती होती म्हणून लेक लाडकी झाली

 ती होती  ......... केवळ तीच होती म्हणून

                  मायेची सारीच नाती मिळाली

                    मग ही दुनिया का उलटी झाली

    खरंच सांगा ओरडून या जगाला

देश वाचवायचा असेल तर मुलीला

 जन्माला घाला मुलीला..... जन्माला घाला.

 सौ. मनिषा वराळे धरणगुत्ती




   

खरा समाज सेवक

    

              खरा समाज सेवक

            

  खोट्या भूल थापा देऊन

निवडून येऊन संसदेत जाऊन

                   गाडी बंगला ऐष आरामात जगून

              पाच वर्षानीच येतो मतदारांना सलाम करून


           अशा स्वार्थी  नेत्यांना जावा आता विसरून

                       कारण......‌‌‌......

 समाजाला आज खर्या समाज सुधारकांची

गरज आहे सूधारण्याला

साधी राहणी उच्च विचारसरणी रूजवणार्या माणसाची


              गरिबीचे  चटके भोगलेल्या मनाला

           असा ओळखा खरा समाज सेवक

      हे ओरडून सांगू या दुनियेला


सौ. मनिषा वराळे धरणगुत्ती

गरज आ 

आजची गरज

     

                         आजची गरज


    महागाईने त्रस्त झालेल्या जनतेला

         दिलासा हवा आज मूक्त जगण्याला

        नेते  येतात आणि जातात प्रचार करून

          पण गरिबांचे कोण घेतो ऐकून


        आज गरज आहे एका सुधारकाची समाजाला 

    जो सार्यांचे हित पाहिल अशी व्यवस्था करण्याला

          वृध्दाश्रमे आणि पाळणाघरे बंद पडायला


      गरज आहे  आजी-आजोबांची आणि आई बाबांच्या   आशीर्वादाची

एकत्र कुटुंब पद्धत अवलंबण्याची

 

सौ. मनीषा वराळे धरणगुत्ती


Thursday, August 20, 2020

प्रिय प्रिन्स

                    🤴    प्रिय प्रिन्स 🤴


खूप खूप धन्यवाद बाळा.अगदी योग्य वेळी तुझा संदेश आणि पुस्तक मिळाली.तुम्ही नेहमीच माझे मनोबल वाढवत आलात.आजच्या घडीला मानसिक आधार मिळणे खूप गरजेचे असताना माझ्या गुरूने माझ्यासाठी योजलेले गिफ्ट खरंच अभिमानास्पद आहे.

                  तुम्ही नेहमीच मला प्रोत्साहीत करत आलात.आज खरंच प्रिन्सचे लेटर वाचून अश्रू अनावर झाले होते.या लहान मुलांत देव वसतो याचा प्रत्यय आला.


                       माझ्यासाठी गुरू माऊली आणि त्यांचे कुटुंबीय म्हणजे माझे बंधू डॉक्टर सुनिल दादा नेहमीच विविध उपक्रम करत असतात.एक ज्ञानाचा सागर आणि सर्व गरजूंचा मार्गदर्शक असणं हे वाटतं तितकं सोपं नाही.

                     सर्वांच्या मते मी कोविड योध्दा असले तरी आज, माझ्या कामाला थोडंसं गालबोट लागलेच आहे.कारण,माझे सासरे काहीही लक्षणे नसताना कोरोना पेशंट ठरले.आणि गावकऱ्यांनी सामाजिक बांधिलकी विसरून खोचक प्रश्न करून हैराण केले आणि मी कसली योध्दा?

                     खरंतर आजारापेक्षा मानसिक त्रासाने हैराण झालेलं माझं कुटुंब एकमेकांना समजावत राहत होतो.आणि यावर आधाराची बाब,प्लस पॉइंट म्हणजे बाळ प्रिन्स तुझं पत्र होय.खरंच खूप मोठा हो.सर्वांचा आशिर्वाद घे आणि दुटप्पी स्वभावाच्या माणसांपासून दूर रहा,या सदिच्छा.

सौ.मनिषा पिंटू वराळे धरणगुत्ती





Thursday, August 13, 2020

लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा

 लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा

माझी लाडाची चिमणी लाडाकोडात वाढली

स्वप्ने ध्येयवेडी तिने होती ग पाहिली

एका हसर्या घरात ती लग्न होऊनिया गेली

सर्वांची लाडकी ती सून नव्हे लेक झाली

माझी लाडकी बहिणाबाई लेकरांची आई झाली

मनकवडा ग साथी इच्छा पूर्ण केली

माया ममता जिव्हाळा आपुलकी सुध्दा मिळाली

आई,आजी आई-बाबा बहिणभाऊ नात्यांत गुंफली

असा मायेचा पदर छोट्या आईने घातली

तिची सखी बनूनिया मोठी आई सोबत राहीली

दोन दीर दोन नणंदा बहिणभाऊ ही लाभली

तेज जीतच्या रूपाने तिचे मात्रुत्व खुलवली

आज शुभेच्छा देताना हर्षभराने मी लिहीली

वाढदिवस लग्नाचा तुमच्या मी नाही विसरली

               सौ.मनिषा वराळे धरणगुत्ती

आवडली तर नक्की लाईक आणि शेअर करा कमेंट करा

Wednesday, August 12, 2020

एक सल मनातली

                       एक सल मनातली

पुन्हा मुलगी झाली म्हणून मन नाराज झालं

मारून कसं टाकू म्हणून दुसऱ्याला सांभाळायला दिलं

आईच्या मायेला पोरकी झालेली पोर आसवांना आधार बनवलं

कुणी रागराग केला, कुणी फटकारलं पण समजून नाही घेतलं

कोरडा घास आसवासवे पोटात ढकललं

हसणार्यासोबत हसलं आणि एकांतात होतं रडलं

बालपणी सखी लाभली स्वप्न जगायचं सापडलं

तरुणपणी ध्येयवेड्या मैत्रीला हरवून बसलं

जीवाला जीव देणारा जोडीदार मिळावा ही आशा मनात धरलं

पण आशा निराशेचं पाठशिवणीचा खेळ असं भासलं

शेवटी आता एकच मग ठरवलं

कर्तव्य करत करत जगावं एवढंच हातात उरलं

जे खदखदत होतं मनात ते मनिषानं जाणलं

अलगद रितं करून डोळं मन मोकळं झालं

                सौ.मनिषा वराळे धरणगुत्ती


Tuesday, August 4, 2020

कर्तव्य

                             कर्तव्य


जिथं नसते माया आणि आपुलकी ती नाती कमजोर असतात
जिथं कर्तव्य पार पाडावे लागते ती खरी जबाबदारी असते
कुणी रूसलं कुणी राग धरलं कुणी चिडलं तरी ती गप्प असते
कर्तव्य पार पाडावे एवढीच अपेक्षा सर्वांची असते
किती सोसावा मनस्ताप किती गिळावा आवंढा पण चुपचाप ती सोसत असतै
अशी भरडली जाते ती पण..... तरीसुद्धा ती हसत असते
कुणी चेष्टा करते कुणी खेचून ठेवते तरीही ती जगत असते
जोडीदाराच्या भरवश्यावर उद्याची स्वप्न बघत असते
कधी हताश उदास होऊन थकून ती गेलेली असते
सर्वांच्या सुखासाठी ती दिवस-रात्र जगत असते.
                           सौ.मनिषा वराळे धरणगुत्ती

Monday, August 3, 2020

रक्षाबंधन नातं बहिणभावाचं

                      भाऊ



चिमुकल्या पावलांनी आलास तू जीवनात भाऊराया
आम्हां बहिणींना लावलीस निरागस माया
कसं सांगू तुला तुच आहेस आधार द्याया
किती प्रेम, जिव्हाळा आणि आपुलकीची देतोस छाया
सुख तुझ्या पावलांनी येणार ही आमची वेडी माया
सुख तुला मिळो तुझं दूख मला मिळो ही भाबडी आमची माया
                सौ.मनिषा वराळे धरणगुत्ती