Thursday, July 30, 2020

आई तुझं चुकतंय ग

                       आई तुझं चुकतंय ग




आई तू सर्वांना जपतेस आवडीनिवडी जपत हळूवार सारं करतेस
म्हणून असेल कदाचित पण आई तू चुकतेस
तू सतत सर्वांचा विचार करतेस, गगनभेदी स्वप्न बघतेस
म्हणून आई तू खूपच चुकतेस
आमच्या मागण्यांचे तू लगेच कबूल करतेस कधी कधी काहीही तडजोड करतेस तरीही......
आई तू चुकतेस
तू हळूच हाक देतेस आणि आम्ही तुझ्यावर खेकसतो
तेव्हा चटकन तुझ्या डोळ्यांत पाणी येतं तरीही तू गप्पच बसतेस
आणि इथेच आई तू चुकतेस
नको करू आता इतका विचार की, तुलाच याचा त्रास होईल
आम्ही आळशीच कामचुकार वागणार कारण......
आपल्या परिस्थितीत तू आणि बाबांनी खूप दिलंय
तरीसुद्धा आम्ही याची जाणीवही नाही ठेवणार
आणि तू कुढत कुढत जगत राहणार
त्यापेक्षा सोडून दे आम्हाला आमच्या जैसे थे वागण्यावर
तुझं यात कुठं काय बिघडतंय....पण.....
आई तुझं चुकतंय, तुझं चुकतंय
                        सौ.मनिषा वराळे धरणगुत्ती

Wednesday, July 29, 2020

दोस्ती

                                            दोस्ती



खरंच मनापासून तुला विचारावसं वाटतं, आजही तितकीच सुंदर आहे का ग आपली शाळा! जिथे आपण बसायचो ती शाळेपुढची मोठाली झाडं,ती पांढरी शुभ्र फुलांची बरसात आजही तशीच आहे काय गं.जिथं मी आणि माझी सखी तासनतास गप्पा मारत बसायचे तो शाळेचा परिसर तितकाच विलोभनीय आहे की बदललंय सारं.........

आजही तितकीच ओढ आहे काय मुलांना शिक्षण घेण्याची,मोठमोठी स्वप्नं बघण्याची.आजही तिला माझी आठवण येत असेल की ती प्रवाहासोबत पुढे गेलीय.
आता तू माहेरी जाशील ना तेव्हा बघ हं थोडा वेळ काढून, माझ्या हातात तर ते अनुभव घेणं उरलं नाही पण तू नक्कीच हसशील का जर तिनेही जुन्या आठवणी जाग्या केल्या तर?

किती अतूट नातं होतं आमचं कुणाची तरी नजर लागली होती आणि मी फक्त तिच्या आभासी जगात जगतीय.पण......


ठिक आहे मी जरा जास्तच वाहत गेलो.तुला आणि तुझ्या आपल्या जीवलग सखींना मैत्री दिनाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा अगोदरच देत आहे ना कारण मला तुझं म्हणजे आपलं बालपण.....आठवता यावं म्हणून बरं का.काळजी घ्या

ताई

                    ताई


ताई, तुझ्या हसर्या प्रसन्न चेहऱ्याला पाहून समाधान वाटलं
तू खूप मोठी शिक्षीका पण तुझा शिष्टाचार या मनाला भावला
तू खडतर प्रवासातनं हे यश आहे ग मिळवलं
सर्वांची काळजी आणि जबाबदारीनं मन तूझं ग कोमेजलं
तू हळवी तितकीच हसरी सारं काही तू हसत हसत पार पाडलं
शिक्षणाची धुरा घेऊन तू सावित्रीची मशाल तेवत ठेवलं
येरे गबाळे येतात तुझ्यावर कुरघोडी करतात, हे ही तुझ्या नजरेतून मी वाचलं
पण... सहनशक्तीची माता तू त्यातही समाधानच मानलं
कितीही झाला त्रास तरी तू कूणाला बोलून नाही दाखवलं
बोलक्या नजरेतले आसू तुझ्या.., माझ्यापासून नाही ग लपलं
असं म्हणतात....मोठी बहीण आईसम असते ते तू पुरेपूर निभावलं
अकाली आलेलं पोरकेपण तू मनातच दाबून ठेवलं
आठवणीतले आई-बाबा तुझ्या प्रत्येक बोलण्यातून जाणवलं
कशी पेलतेस ही धीराची धुरा मला आजवर नाही कळलं
अशी ज्ञानगंगा पोचवतेस जिथं शिक्षणाचं महत्त्व तू सांगितलं
तुझ्याच क्रुपाद्रुष्टीने वस्तीवर साक्षरतेचे सूर उमटलं
साक्षरतेचे सूर उमटलं.......
                               सौ.मनीषा वराळे धरणगुत्ती

झरा मायेचा

                            झरा मायेचा



एका आईचं कौतुक मी कितीदा करावं
बाईपण(शिक्षिका)मिरवताना आईपण विसरावं
तिच्या लाडाचं लेकरू एकुलतं एक परी
त्याला सोडूनिया घरी तिने पुढेच चालावं
दिन दुबळ्या कष्टकर्यांना शहाणपण द्यावं
असं वाड्यावस्त्यांवरून तिनं शिक्षण पेरावं
तिच्या अतीव कष्टांचं फळ देवाजीनं द्यावं
सेवाभावी मन तिच्या अंकुरात उतरावं
जनसेवा हीच ईश्वर सेवा गुण त्यानंही टाळावं
असं संस्काराचं बीज त्या लेकरानं अंगिकारावी
किती करू मी कौतुक शब्द अपुरे पडावं
ध्येयवेड्या प्रतिभाचं बीज फुलावं फळावं
यश गगनाला त्याचं अभिमानानं भिडावं
प्रथमेशा तुला या सदिच्छा आणि तळमळ मनाची कळाल
असं गुणी लेकरू ताई तुला भाग्यानं मिळावं
एक मनिषा भाबडी यश शिखरावर पोचावं
हातगुण म्हणू का रे तू़झी जिज्ञासू ही इच्छा
झाला पोर माहा डॉक्टर या पुर्या केल्या तू अपेक्षा
पुर्या केल्या तू अपेक्षा......

सौ.मनिषा वराळे धरणगुत्ती

मुली असणं

                               मुली असणं
खरंच मनापासून धन्यवाद निसर्गाच्या निर्मितीसाठी.मुलगी जन्मली की,का नाराज होतात नातेवाईक आई-बाप हेच कळत नाही.तिच्या बाललीला तर मन रमवतातच.पण.....ती लहान असूनही किती संयमी असते.समजदारीने लागते हे लक्षात घेऊन विचार केला पाहिजे.
७/८वर्षाची ती चिमणी किती समजूतीने बोलते हे ऐकून आईच्या डोळ्यातलं पाणी थांबत नाही.

होय मलाही दोन मुली आहेत आणि त्या माझ्या जीवाभावाच्या मैत्रीणी आहेत.कधी त्या माझ्या मुली नसून आईप्रमाणे वागतात.माझी काळजी घेतात, माझं मन जपतात, खूप प्रेम करतात.

या सर्व गोष्टींचा विचार करून कबुली द्यावीशी वाटली.माझ्या छोटया मुलीचा आज वाढदिवस आहे.आणि माझ्या सोबत घडणाऱ्या प्रत्येक गोष्टीची ती साक्षीदार आहे.मन खूप उदास असतं, तेव्हा नात्याने आपला रंग दाखवला होता.आणि या चिमुकलीनेही तो अनुभव अनुभवला होता.

म्हणून कर्तव्य करत जगताना एकच गोष्ट ठरवली की, मुलांसाठी जगायचं.त्यांच्यासाठी हसायचं आणि त्यांना भरभरून प्रेम देण्याचा प्रयत्न करायचा.कारण, उद्या त्याही लग्न होऊन सासरी जातील पण जाताना इथला आनंद आणि उमेद घेऊन जातील.

त्या शिकून मोठ्या पदावर पोचतील.पण पदापेक्षाही माणुसकी जपतील.माझ्या मुली प्रत्येक गरजवंताला मदत करतील.आणि आईबापाचे संस्कार जपतील.याच आशेवर त्यांना मी खूप खूप शुभेच्छा देते की,जे जे त्यांना हवे ते ते मिळो नाव,प्रसिध्दी,इज्जत आणि माणुसकी त्यांच्या आयुष्यात हातात हात घालून नांदो याच सदिच्छा.


आपल्या प्रतिक्रिया अवश्य कळवा ही नम्र विनंती.

सौ.मनिषा वराळे धरणगुत्ती


स

Monday, July 20, 2020

लोढणा

             लोढणा
गाय म्हैस जास्त लांब जाऊ नये म्हणून त्यांच्या गळ्यात घालून चरायला सोडुन दिले जाते.तर अशा या लोढण्याला बघत मला वाटलं की,गाय म्हैस यांच्या जिवाभावाची सख्खी साथ हा लोढणा असतो.आणि तिथंच माझं चुकलं.
  जेव्हा मला कळालं की,गाय म्हैस लांब जाऊ नये म्हणून बांधलेल्या या लोढण्यामुळे कित्येकदा त्यांना पळता येत नाही आणि मग रक्त बंबाळ होऊन त्या तोंडावर पडतात.तेव्हा मला खूप वाईट वाटलं.
कारण, मी असा लोढणा होते जो सगळ्यांच्या उपयोगी पडत होते.कधीकधी स्वत:ला त्रास करून घेत होते पण पुढच्याला आनंद,मदत करत होते.कुणी माझ्यावर हसायचं, कुणी चिडवायला बघायचं, कुणी नशिबाचा हवाला द्यायचं.आणि मी परिस्थिती, वेळेनुसार सारं समजून उमजून सावरायचं.
आज खरंच खूप छान वाटले की मी ज्यांना ज्यांना जीव लावला आहे त्यांनी व्यवहार पाळला होता आणि कर्तव्य पार पाडली होती.खरंच आज बुध्दी हरली होती आणि नशीब जिंकलं होतं.
असं गरजेचे तरीही गणतीत नसलेलं कर्तव्य पार पाडत आहेत म्हणूनच तर हसत हसत जगावं लागतं शेवटी काय लोढणं आणि काय चपराशी बजावतोय तर काळजी आणि सेवाच ना.मग कुणी काहीही म्हणोत परंतु कर्मण्ये वाधिकारस्ते मां फलेशु कदाचनं........ हेच खरं आहे ना!
               सौ.मनीषा वराळे धरणगुत्ती

Tuesday, July 7, 2020

आपूलकी

         आपूलकी
प्रार्थनेतली खरी शक्ती, विश्वास अन् आपुलकी
असंच उदंड कार्य घडत राहो जग म्हणावे तुम्हांला लकी
फुललेल्या गुलाबाप्रमाणे चेहरा सदैव प्रफूल्लीत
दुसऱ्याला यशस्वी बनवण्यासाठी नेहमीच उत्तेजीत
माझ्याप्रमाणेच कळावी सर्वांना तुमची जगण्याची रीत
शुभेच्छा देण्यासाठी घडले लेखन माझ्याकडून भीतभीत

एक शिक्षिका अशीही

                 एक शिक्षिका अशीही
ईश्वराने दिलंय तुम्हांला एक वरदान
शिक्षक होऊन करत आहात ज्ञानाचे दान
प्रभू करवून घेतोय कार्य असे महान
प्रसन्न चेहऱ्याने वागता सर्वांशी छान
जगण्याच्या संघर्षाचे पेलता तुम्ही आव्हान
गोरगरिबांना समजून सांगता संघर्षाचे गुणगान
दू:खाविन सूख नाही, नाही संघर्षाविन जीवन
तुमच्याशी भेट घडून जीवन झाले पावन

जिजाऊंचा पूत्र_शिवाजी

          जिजाऊंचा पूत्र_शिवाजी
जिजाऊंचा पूत्र झाला दिनांचा कैवारी
शिवाई देवीच्या आशीर्वादाने किमया केली भारी
धन्य झाला तो किल्ला शिवनेरी
दादाजी लाभले गुरू शिवबाला देण्या शिक्षण भारी
असा धाडसी बालक त्याची नजर होती करारी
घेऊन मर्दमराठी मावळे केली अशी स्वारी
मूर्ती छोटी पण किर्ती मोठी गगनापरी
हिंदवी स्वराज्य स्थापले घेऊन गरीबांना बरोबरी
"परस्त्री मातेसमान "मानली होती खरीखुरी
गनिमी काव्याने बेजार करून टाकले वैर्याना तरी
पेठार्यामधून निघाली शंभूसह शिवबाची स्वारी
अशा संस्कारी राजाचा अभिमान वाटावा किती तरी
जय भवानी जय शिवाजी म्हणताच येई जगण्याला उभारी
सळसळता जोश देऊनी गेला राजा जोशभारी
असा जिजाऊंचा पूत्र झाला दिनदुबळ्यांचा कैवारी