Sunday, September 27, 2020

सुजाता एक सुंदर रहस्य

                 सुजाता एक सुंदर रहस्य

 खरंच खूप म्हणजे खूपच आठवण आली कालच्या रात्री सुजाता तुझी.तू म्हणायचीस की,भासात श्वासात तूझी सोबत नेहमीच असणार.पण वेडे....कालचा दिवस माझ्यासाठी खूपच कठीण गेला.क्षणभर वाटलं,तू किती विचार केला असशील माझा? सुजाता तू माझ्या सोबत कमी पण तिच्या सोबत खूप फिरलीस म्हणे? आणि वरचेवर छोट्या छोट्या भेटवस्तू देऊन तिला ओळखण्याचा तुझा प्रयत्न किती साधा होता.सुजाता तू मला मारलेली पहिली गळाभेट आणि तू घेतलेलं चुंबन.......

दोन्हीची काल खूप आठवण आली.तिला खूश करण्यासाठी मी तिच्या घरी गेलो आणि निदान सरप्राइज बर्थडे करता येईल या विचाराने, पण....सुजा...........तू अगदी बरोबर ओळखलं होतंस ग तिला! 

तुझ्यामाझ्यात झालेला संवाद आणि तिनं बोललेलं शब्द यांनी खरंच काळीज चिरत गेलं माझं.कसंबसं स्वत: ला सावरलं पण तुला तर माहीतच आहे की, हे मी जास्त वेळ नाही करू शकत.माझा त्रास वाढल्याने माझी घुसमट होत होती आणि तेव्हा सुजाता मला खरोखर वाटलं की,तू किती सहज तुझा आनंद, तुझं सुख तिच्या ओंजळीत देऊन टाकलं होतंस.तू किती रडलीस आणि आत्महत्येचा प्रयत्न तसा विचार करून तिच्या गळ्यात पडून रडलीस तेव्हा मला खूप अपराधी वाटलं होतं.

माझ्या चेहऱ्यावरील भाव वाचून तू मला तिच्यावर कविता लिहायला सांगितलंस.आणि तेव्हा तुझं त्यागातलं प्रेम मला जाणवलं.मी तुला म्हटलंही  होते की,ती,तू , मी आणि दिशा आपण  चौघी खूप छान मैत्री निभवू.तेव्हा तुला आठवतं....... किती सहजपणे तू बोलली होतीस की, एका म्यानात एकच तलवार राहू शकते आणि ती फक्त तुझी इच्छा असेल.

दिशाला अनेक मैत्रीणी मिळतीलही आणि तुझ्या सहवासात ती खुलते पण..... फक्त तिच्याच सवडीनुसार! म्हणून तू तिचा विचार सोडून दे आणि माझं काय? 

आज ना उद्या मी सर्व्हिससाठी इकडे तिकडे जाईन पण नेहमीच तुझ्या संपर्कात असेन.भेटता नाही येणार आपल्याला! पण फोनवर बोलशील ना मला विसरणार तर नाहीस ना? आणि तसंही इच्छा मात्र नेहमीच तुझ्या समोर असेल.तू मनात आणलस तर तिला भेटशील ही आणि एक ना एक दिवस तिला तुझं निखळ स्वच्छ मैत्री प्रेम मान्यच करावं लागेल.

तुला आठवतं सुजाता.......ती सुरवातीला किती मोजकंच बोलायची आणि तुला गमावू नये म्हणून मी तुझ्यावर फक्त नजरेने बघत असायचो.तेव्हा थोड्या दिवसांनी ती अगदी मनातलं बोलायला लागली खुलायला लागली.आणि दुःख लपवत डोळे पुसत तू मला बघायचीस तेव्हा खूप अपराधी वाटायचं ग मला.....

पण तू पुण्यात चांगल्या पद्धतीने रुळलीस आणि नव नव्या वस्तू खरेदी करून संसार सुखाचा करत होतीस.किती खूश होऊन तू मला सांगायला अधीर व्हायचीस.तेव्हा वाटायचं की,धावत धावत यावं आणि तुला भेटावं.तुझी ओढ मनाला सावरत सावरत तिच्या प्रेमाखातर मी तिच्यात गुंतत गेलो.तीही मला वाटतं माझी झाली असावी.आम्ही खूप गप्पा मारत बसायचे तासनतास एकमेकींशी गप्पा मारल्या आणि नंतर रात्री उशिरा सुध्दा.आमची जेवणाची वेळ झालेली असायची आणि तिचा फोन यायचा.आता हे रोजचंच झाले होते.घरची रिंग वाजली की अंदाज लावायची.इतकं आम्ही रमलो होतो पण ‌....

अचानक काय झालं काय माहित नाही,आमची मैत्री तिच्या घरच्यांना खटकू लागली.एकदा तर तिची आजी आजारी असताना मी तिच्या नकळत आजीची तपासणी करताना थोडीशी सेवा केली होती.हे तिच्या लहान मावशीला माहीत होते आज कदाचित ती आजी सुध्दा लक्षात घेऊन मी जाईन तेव्हा माझी गळाभेट घेते मायेची ऊब देते.पण आजही तिच्या मोठ्या मावशीचे शब्द आठवले की खूप राग येतो.आणि आपलं कोणीच नाही असं वाटतं एकटेपणा जाणवतो.

कधी तुला गमावून बसलो याचं वाईट वाटतं तर कधी मी हरल्याचा भास होतो.सुजाता नाही सहन होत तीचं रागावणं,तिरसट बोलणं! 

तुला माहित आहे की किती जिव्हारी लागतं आणि मग आठवतं सुजाता तू माझ्या एका कटाक्षासाठी किती बैचेन असायचीस.आणि अगदी तिच्याही नकळत माझा हात तुझ्या हातात असायचा.कुणी बघून विचारलंच तर तू हसून वेळ मारुन न्यायचीस.देवाने याचीच शिक्षा दिली नसेल ना मला कि, मी नेहमीच तिच्या आठवणीत झुरावं आणि तिनं ओळखूनही मला दूर करावं.

अजून एक सुजाता, तिलाही तुझी खूप आठवण येते ग.आजही तुझ्या आठवणीत ती खूप रडते.तू पुन्हा भेटावीस अशी इच्छा व्यक्त करते.सुजा असं म्हणतात की, मनापासून मागितलेली गोष्ट एक ना एक दिवस देवाला द्यावीच लागते.मग तूच सांग देव काय आणि कसे देणार? 

सुजाता तुझ्याशी आता रोजच मनातल्या मनात बोलणं होतं आणि मग वाटतं की मी किती मोठी चूक केली आहे हे जाणवते.किती छोटी मागणी होती ग तुझी की मी फक्त एकदा तुला भेटून कडकडून मिठी मारावी.आणि तिच्या प्रेमाखातर मी तुझी ति ही इच्छा पूर्ण केली नाही.

सुजाता तुला मी कळले होते पण मला तू उशिराच समजलीस.तरीही जाता जाता तू तिनं खूश राहीलं पाहिजे हे कबूल करून घेतलंस.

किती मोठ्या मनाची आहेस ग तू! पण सुजाता तुला आजही माझी हालत बघून त्रास होतो का माझ्या मनाची अवस्था बघून, तिचं  मोजकं बोलणं ऐकून, भावना व्यक्त न करता केवळ औपचारिकता म्हणून बोलताना पाहून तुलाही वाईट वाटत असेल ना?

सुजाता कधी कधी वाटतं की,तू जेव्हा येशील ना तेव्हा सर्व काही सुरळीत होईल.मन मान्यच करत नाही कि तू नाहीस.आणि मग वाटतं की तू दिलेलं मला घेता आलं नाही आणि मी दिलेलं तिला आवडत नाही.किती भ्रामक कल्पनेत जगायचं तेच कळत नाही.पण मग वाटतं की तुला समजून घेतलं नाही याचीच तर ही सजा मिळत असावी.पण तू हे नक्की बघत असणार आणि माझी अवस्था पाहून तुलाही वाईट वाटत असेल ना? म्हणून तर म्हणतो की तू लवकर परत ये आणि तेव्हाच सारं व्यवस्थित होईल हे मात्र नक्की! 

करशील ना तुझ्या हळुवार कप्प्यात जपून ठेवलेल्या या आपल्या मैत्रीसाठी............ तुझीच न झालेली एक आशा.........

सौ.मनिषा पिंटू वराळे धरणगुत्ती

Wednesday, September 23, 2020

ती फक्त मैत्रिण

                    ती फक्त मैत्रिण

आज तिचा वाढदिवस.खरंतर कालपासूनच मन विविध उपक्रम रचत आहे.हे असं केलं तर तिला काय वाटेल? किंवा मग असं ठरवलं तर ती खूश होईल की नाही? नुसत्या विचारांनी हैराण परेशान झाले होते.

तर आज जवळपास गेल्या दहा पंधरा वर्षांपासून तिला मी ओळखते.मुक्त विद्यापीठात प्रवेश घेतला आणि ती माझी वर्गमैत्रिण झाली.नंतर स्वभाव पटला आणि आम्ही तिघी एकत्र आलो.तश्या इतरही मैत्रिणी होत्या.कुणी तर उच्च पदावर कार्यरत आहेत आणि तरीही मला हिच का आवडली माहीत नाही.

माझ्यासारखं सर्व जबाबदाऱ्या पार पाडत शिक्षण घेण्याची आवड जपणारी ती होती.येताना होणारी कुतर ओढ आणि जाताना झालेली घाई.हिला कुठंतरी एक मुक्त होण्यासाठी असेल किंवा तिला समजून घेणं आवश्यक आहे हे लक्षात घेऊन मी तिला आपलं मानलं.आणि सुजाता मला समजून घेत असताना माझ्यावर जीवापाड प्रेम करत असताना मला ही हवीशी वाटत होती.कारण, घुसमटत ती जगू नये असे मला मनापासून वाटत होतं.मी माझा विचार सुजाताला बोलून दाखवला होता.तिलाही खूप छान वाटले.अगदी मोकळेपणाने तिने मला सांगितले की होय तीला खरंच खूप गरज आहे माझी.एका हातात इच्छा होती आणि दुसर्या हातात आनंद होता आणि मी फक्त इच्छा निवडली होती म्हणूनच कदाचित मला आणि तिला सोडून खूप दूर गेली होती माझी सखी आमची सुजाता.

तिच्या आठवणीत मन खचलं होतं आणि तरीही ती शांतपणे स्वप्नात येऊन सांगायची की मी नेमकं कसं जगावं.

मी माझ्या अंतरीची सुजाता जपली आणि हिला मुक्त होण्यासाठी वेळ दिला.ती खरंच खूप छान आहे कामाला वाघ आहे आणि तरीही ती हसमुख मनात विचार ठेवून वागणारी.चिडचिड करणारी कधी लहान मुलीसारखं खुदकन हसणारी अशी अल्लड माझी सखी आहे.

रोज न चुकता तिच्या प्रेमाखातर मी माझ्या कामातून वेळ काढून तिला हवं तेवढा वेळ तिच्याशी बोलायची.आणि तिला सावरता सावरता ती कधी आमच्या कुटुंबातील सदस्य झाली हे माझं मलाच कळलं नाही.

आता मात्र ती खूप बदलली आहे.का कुणास ठाऊक पण ती मला म्हणाली की ती फक्त मैत्रिण आहे माझी.खळकन काच तुटून हातावर पडावी आणि हात सावरताना छाती फुटावी असंच काहीसं झालं आहे.

तरीही ती सुखात राहो आरोग्य संपन्न आयुष्य जगावी याच या मंगलदिनी तिच्या प्रेमाखातर वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा.आणि सदिच्छा सुध्दा.राधारानी......................नको रागवू खूप त्रास होतो तुला नाही कळायचं.

               सौ. मनिषा पिंटू वराळे धरणगुत्ती


Friday, September 18, 2020

एक सूर्य मावळला तो ही असा

                      एक सूर्य मावळला तो ही असा........

स्वातंत्र्य सैनिक शूर वीर तो भारतमातेचा सुपूत्र लढला

चळवळ केली भूमिगत झाला पण... देशासाठी अनमोल ठरला

काँग्रेसच्या प्रणेत्या इंदिराजींनी त्यांचा मान राखला

विशेष सल्लागार म्हणून बहूमोलाचा किताब मिळाला

सळसळता कार्यप्रवण तो मनाने खूपच हळवा राहिला

कुटूंबासाठी सर्व काही,मूग गिळून तो गप्प बसला

होणारी घुसमट अलगद लेखणीतून उतरत गेला

नामवंत मान्यवरांसोबत ज्येष्ठ साहित्य किताब मिळाला

लेखनीत स्वत:च आयुष्य तो मनसोक्त जगत राहिला

नव्वदीपार करूनही तो लेखनीत उमदा योध्दा ठरला

समग्र वाड्:मय  करण्यासाठी जीव वेडा तो खूप धडपडला

मानलं तर सारंच आपलं म्हणून मानसपुत्र तो गुणी लाभला

पित्यापरी सेवा घडली अंतसमयी मात्र....घोळ झाला

विरह वेडा कसा सोसावा सुनिल.... आता थोडा डळमळला

असंख्य साहित्यिकांचा आधार कवितासागरचा संचालक बनला

अशा या फ्रिडम फायटर विषयी मनातला किंतू लेखणीतून उतरला

अशोक दादा..... तुमच्या जाण्याने एक पोरकेपणा साहित्याला आला

कितीदा फोडावा टाहो तरी पुन्हा हा देह नाहीच भेटला

आदरांजली वाहावी कशी साश्रुनयनांनाही पूर आला

      सौ. मनिषा पिंटू वराळे धरणगुत्ती

Monday, September 14, 2020

असे हे दात्रुत्व माझ्या भावाचे

                असे हे दात्रूत्व माझ्या भावाचे

नमस्कार,मी मनिषा वराळे राहणार धरणगुत्ती.आज माणुसकी आणि माया जरी संपत चालली असली तरी काही ठिकाणी निर्व्याज आपुलकीची भावना व्यक्त होताना दिसत आहे त्यातीलच एक हा अनुभव.

खरंतर नाती म्हटलं की, काही जन्माने मिळतात तर, काही आपल्या स्वभावाने मिळतात.काही सहज तोंड ओळखीतून निर्माण होतात तर, काही अगदीच जीवश्च कंठश्च नाती बनतात.ओढ दोन मनांची! जिथे निरपेक्ष भावनेने नातं असते त्या निर्मळ नात्याला टिकवण्यासाठी निसर्ग सुध्दा अभिनव साथ देत असतोच.

आता आपल्या सर्वांनाच माहिती आहे की, सध्या कोरोनाने किती विचित्र अवस्था आणलीय.मातसांची जीवनशैली बदललीय.काही तर उपासमारी भोगत आहेत.काही कर्जबाजारी झालीत, काही व्यसनाच्या आहारी गेलीत आणि काही निराशेच्या गर्तेत सापडलीत.

जसं आपण ऐकतो की,' कर्म कर फल की चिंता न कर!'या उक्तीप्रमाणे आणि देवाच्या काठीचा आवाज होत नसतो! तर वेळ आली तर तो सर्वांना बरोबर त्याची लायकी दाखवत़ो.अशाप्रकारे कित्येक वचनं आपण वाचत असतो आणि आपल्या परीने ते अंगिकारून जगत असतो.

सध्याच्या कोरोनाच्या या महामारीमध्ये स्वत: च पोट भरणं सुध्दा  मुश्किल होत आहे.कारण, हाताला काम नाही आणि ज्यांना काम आहे पण त्यांचा मोबदला वेळेवर मिळत नाही आणि आपल्यासारखीच स्थिती प्रत्येकाची असणार हे जाणून, येईल त्या परिस्थितीत शांतपणे.   सामोरे जाऊन जीवन जगावं लागतं तरीही आपण देशाचे काही तरी देणे लागतो या भावनेतून प्रेरीत होऊन एक सामाजिक बांधिलकी जपण्याचा प्रयत्न करणारे एक ध्येयवेडे कुटुंब आज मी पाहिले.नव्हेतर, त्यांच्या मनातला निरागस प्रामाणिकपणा सुध्दा अनुभवला आणि डोळ्यात पाणी आल्यावाचून राहिलं नाही.

आजची बचत उद्या कामाला येईल या आशेने आपले जवळचे नातेवाईक सुध्दा जेव्हा मदत मिगितली तर लांब जातात, अपमानास्पद वागणूक देऊन टाळाटाळ करतात तेव्हा हे कुटुंब अगदी आधारस्तंभ होऊन पाठीशी राहतात.तेव्हा ते हिमालयाहूनही ऊंच आणि परमेश्र्वराचे खरेखुरे दूत वाटतात.

आज अशा कितीतरी गरजवंताला त्यांनी गरजेच्या वस्तूंचा आणि पैशांची मदत केली आहे कोणतीही जाहिरात बाजी न करता.हा खरंच त्यांच्या मनाचा मोठेपणाच आहे.जेव्हा भुकेल्याची भूक शमवतो तेव्हा तो दाता श्रेष्ठ असतोच आणि या उपकाराची परतफेड होऊच शकत नाही जेव्हा आपण भरल्या डोळ्यांनी त्यांना हे विचारत असतो तेव्हा ते अगदी प्रांजळपणे सांगतात की, आपण एका भावाचे कर्तव्य पार पाडत आहोत बाकी काही नाही.आणि मग वाटतं,असा भाऊ, असं दात्रुत्व प्रत्येक बहिणीला मिळावं.

असा ध्येयवेडा पाठिराखा जिच्यापाठी असेल तिला प्रत्येक संकटात ठामपणे उभे राहण्याचे बळ नक्कीच मिळेल.आणि मनापासून सांगावसं वाटतं की,

सर....... तुम्ही देवाची लेकरं तर आहातच पण.... माझ्यासारख्या कित्येक बहिणींचा भक्कम आधार, एक जीवन संजीवनी सुध्दा आहात.खूप खूप मोठे व्हा.यशस्वी व्हा.आणि असेच नेहमीच माझ्या पाठीशी उभे रहा याच सदिच्छा.

सौ.मनिषा पिंटू वराळे धरणगुत्ती

Sunday, September 13, 2020

गुरू माऊली

            गुरू माऊली

गुरू माऊली या शब्दांतच सारं जीवनाचं सार लपलंय असं वाटतं.कारण गुरू तो जो आदर्शवादी आणि सकारात्मक ऊर्जा देण्याचं आशावादी कार्य करतो आणि माऊली ती जी आपल्या पिल्लांना जगण्याचं बळ देते.जणू बाळ कडूच पाजते.सुसंस्कारी बनवते आणि गगनभरारी घेण्याचं बळ देते.

आणि या दोन्हींचा संगम म्हणजे वयाने समवयस्क असूनही विचाराने अव्वल स्थानावर असलेली,साजिरी दिसणारी आमची गुरुमाऊली.सौ. संजिवनी सुनील पाटील या होय.

आज माझ्या या सखीचा वाढदिवस.अगदी साधी राहणी असलेलं हे व्यक्तीमत्त्व.यांच्या डोळ्यात अथांग मायेचा सागर दिसावा असे डोळे.आणि असं ह्रदय ज्यांत सर्वाविषयी प्रेम आणि क्षमाभाव लपलेला असतो.या ज्यांच्या सहवासात राहतात ते जणू वटवृक्ष आहेत कारण, असंख्य बुध्दीजीवींना आपली ही संजिवनी देऊन जीवन प्रफुल्लित करत आहेत असं वाटतं.

आता प्रश्न पडला असेल की, नेमकी ही व्यक्ती कोण बरं?तर ती व्यक्ती आहे कविता सागर पब्लिकेशन्सची संचालिका, मुद्रित शोधिका सौ. संजिवनी सुनील पाटील.

असं म्हणतात की, छोटं कुटुंब सूखी कुटुंब असतं पण यांनी जे कुटुंब जोडलंय त्याचा विचार करणं कल्पनेच्या पलीकडचे आहे.सातासमुद्रापारसुध्दा यांचे अनेक स्नेही लेखक, कवी आहेत.हे ही नसे थोडके की,तळागाळातल्या लेखक कवींशी सुध्दा यांनी ऋणानुबंध जोडलेले आहेत.

स्वप्न पहावं आकाशाला गवसणी घालणारे,पण पाय...... पाय असावा धरणीमातेला कुशीत घेऊन असं जीवन जगणार्या या माझ्या गुरू माऊलींला माझ्या कडून व माझ्या परिवाराकडून वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा.

तुम जियो हजारो साल,साल के दिन हो पचास हजार! 

               सौ.मनिषा पिंटू वराळे धरणगुत्ती

स्पंदन_दत्ताजी पायमोडे

                      स्पंदन

स्त्रीजन्माचा पुरस्कर्ता असणारे दत्ताजी पायमोडे सर यांना खूप खूप शुभेच्छा.भ्रुणहत्या थांबलीच पाहिजे यासाठी जीवतोडून सांगूनही काही महाभाग ऐकत नाहीत तेव्हा हे जळजळीत अंजनाचे काम करेल एवढं नक्की.

एकूण बारा कविता आणि त्यासुद्धा विश्लेषणात्मक अर्थ सांगून लिहीलेल्या आहेत.लेकीचं महत्त्व सांगणार्या बापाची तळमळ पाहणा-या कविता वाचून मनाला खूप समाधान वाटले.

जिकडे तिकडे स्त्रीभ्रूण हत्येचे प्रमाण वाढलेलं असताना तुमच्या कवितांमुळे नक्कीच फरक पडेल आणि सासूरवासही थांबेल असं वाटतं.

आईच्या मात्रुत्वाची महती समजणं,तिचा कोंडमारा समजणं हे वाटतं तितकं सोपं नसतंच! पण.... तुम्ही ते सरळसोट पणे मांडलेले आहे.यातून तुमच्या मात्रुप्रेमाची भक्ती दिसते.

तुमच्या लेखणीतून उतरलेल्या परखडपणाला माझा मनापासून सलाम.असेच लेखन करत रहा आणि समाज हिताचे साहित्य निर्माण करा.याच सदिच्छा देऊन मी आपली रजा घेते.

हे साहित्य मला डॉक्टर सुनिल दादा पाटील यांनी देऊन माझे मनोबल वाढविले तर याबद्दल तुम्हाला मनापासून धन्यवाद.खूप प्रगती होवो हीच सदिच्छा.

सौ.मनिषा पिंटू वराळे धरणगुत्ती



भावविभोरी,लय माझ्या अंतरीची

           भाव विभोरी,लय माझ्या अंतरीची

                      डॉ.   स्मिता गिरी

डॉ.स्मिता गिरी मॅडम तुमचे हार्दिक हार्दिक अभिनंदन.खूप अनुभव संपन्न अशा कविता आहेत ज्या मनाला सहज स्पर्शून जातात.आणि भाव विभोरी या पहिल्याच कवितेतून अंतरीची लय मांडताना निसर्ग अनुभव, नाती सांभाळताना होणारी कसरत खूप स्पष्ट शब्दांतून मांडून वाचकांच्या मनाचा ठाव घेतला आहात.

व्याभिचारी व्यक्ती ही जवळचीच असते आणि अत्याचारीत पिडीता आपले मनातील दू:ख सांगताना....का मी मुलगी झाले?हा प्रश्न विचारून मन हेलावून सोडत आहे.

खचून न जाता धीराने जगण्यासाठी कवयित्रीने जीवनाचा उत्सव व्हावे या कवितेतून सकारात्मक विचारांचा प्रसार करत आहे.

चूक की बरोबर या कवितेला वाचताना अक्षरशः असं वाटतं की, आताच्या परिस्थितीला साजेशी कविता केलेली आहे असे वाटते.खूपच आवडली ही कविता.

समाजाची रांड,तो आणि ती, जगणं,डोईवरचा भारा अशा एकापेक्षा एक सरस कविता आहेत.वाचताना भान हरपून जातं.मैत्री मनाची,माणसांचे मर्म, शेतकरी राजा लाखोंचा पोशिंदा,मंत्रमहान,गद्दारी निसर्गाशी अशा खूप छान डोळ्यात अंजन घालणार्या कविता केलेल्या आहेत.rudhayach ह्रदयाची चाळणी या कवितेमध्ये एक सुचवावसं वाटतं ते असं की,आपल्याच रक्त मांणसांचे गोळे हे याऐवजी आपल्याच रक्तामांसाचे गोळे हे असं असतं तरी खूप छान उद्बबोधक झालं असतं.

एकूण सर्वच कविता खूप छान आहेत.कोणत्याही परिस्थितीत ठाम राहायला शिकवणार्या आहेत असे वाटते.

तुमच्या पुढील वाटचालीस खूप खूप शुभेच्छा.आणि कविता सागर प्रकाशन चे डॉक्टर सुनिल दादा पाटील यांनी हे साहित्य माझ्यासाठी पाठवले होते म्हणून त्यांचेही खूप खूप आभार.

              अशीच आनंददायी साथ लाभावी या सदिच्छा.

                                                      आपलीच,. 

                                           सौ.मनिषा पिंटू वराळे धरणगुत्ती

   

                                   

Friday, September 11, 2020

जागतिक प्रथमोपचार दिन

                       जागतिक प्रथमोपचार दिन

          जनसेवा हीच ईश्वर सेवा मी मानली

प्रथमोपचाराने रूग्णांना मदत केली

नाही मोठं पद तरी सेवाभाव मी जपून राहिली

येणार्यांच्या वेदनेवर हळूवार फुंकर घातली

कसं सांगू मी जीवनरीत आज अनुभवली

पुढच्यास ठेस मागचा शहाणा ही गत नाही उरली

प्रत्येकाने फक्त आपली कातडी होती बचावली

तरीही.... जनसेवा हीच ईश्वर सेवा मी मानली

कुणी हसलं कुणी चिडवलं कुणी टिंगल टवाळी सुध्दा केली

मी मदतनीस, मी शिपाई शिक्षणाचा अर्थ जपली

नको मला मानपान, नको उणेदूणे फक्त माणुसकी जपली

आज दिन हा प्रथमोपचाराचा म्हणून लेखणी उठली

कित्येक मनिषांच्या भावना तिने, या निमित्ताने साकारली.

सौ.मनिषा पिंटू वराळे धरणगुत्ती

सर्वांना जागतिक प्रथमोपचार दिनाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा

Thursday, September 10, 2020

माझी म्हातारी

 माझी म्हातारी म्हणे लहानी असल्यापासन राबतीय

आईच्या घरप्रपंचात पोरासारखी वागतीय

बहिणींना माहेर  करुन मानानं सासरी धाडतीय 

 माझी म्हातारी म्हणे लहानी असल्यापासन राबतीय //१// 

 लग्नानं सूख मिळंल असं तिची आई सांगतीय 

म्हणून....  म्हातारीनंलग्न करुन बघावं म्हणून   संसार थाटतीय 

नवर्याचं  बळग मोठं त्यात म्हातारी थोरली सून  झालीय 

इटकी पिटकी   दीर जणू मेंढराचं लेंढार   बघतीय  

दिवस रात्र   राबून  तिनं सार्यांना होत सांभाळलं 

लग्न करून प्रपंचा  सुध्दा दिला तिनं थाटून  

आता  कुठं  पोरंसुध्दा हातातोंडाला आली व्हती 

एका पाठी दुसर्याची ही सून  घरात नांदत व्हती 

 म्हातारीला पण बाळगोपाळांची आशा  लागून  राहती

 पाच मुलांत बसताना तिला तहान भूक लागत नव्हती 

 आता म्हातारीनं विसावावं एवढीच माफक इच्छा व्हती 

पण... तिच्या हाडांना बसून राहण्याची सवय नव्हती 

आजही आमची म्हातारी तरण्यांना मागे पाडत व्हती 

तिच्या कष्टापुढे हत्तीचं बळ नमवत व्हती 

अशी म्हातारी आमची आज गपचिप बसून व्हती 

कोरोनाने हरवण्याचं ठरवलं तरी म्हातारी जिंकली व्हती 

कारण..... दोन रुपयांसाठी तिनं विहीर सुध्दाखणली व्हती 

तिच्या कष.टाला खरंच तोड नव्हती म्हातारी आमची

सर्वांसाठी खरंच खूप राबली व्हती 

खरंच खूप राबली व्हती .          

सौ मनिषा पिंटू वराळे धरणगुत्ती


Wednesday, September 9, 2020

घरधनीनींचं मन

                                 घरधनीनींचं मन

    रोजंदारीचं काम हुतं माझं

कोरोना मडं बसवलं तुझं

काळतोंड्या तुला घर दिसलं माझं

आणि घरधन्याला बाधलास केलास तुझं

कुंकू माझं बळकट म्हणून तोंड काळं केलं तुझं

हाताचं गेलं काम तरी डोक्यात ईचाराचं काहूर तुझं

कधी जाशील या दुनियेतनं काय वंगाळ रूपडं तुझं

धन्याला बघून दिवस सारते मडं बसवलं तुझं

इवल्या इवल्या शब्दांनी आधाराची सांगड घालतो

हळूच सांगून हिताच्या गोष्टी तो माझी समजूत काढतो

नशीब बलवत्तर म्हणून धन्याला नजरेसमोर बघतो

काळतोंड्या कधी तुझा नायनाट होतो

कधी तुझा नायनाट होतो

           सौ.मनिषा वराळे धरणगुत्ती

Sunday, September 6, 2020

कोविड १९ आजाराचा शिक्षण व्यवस्थेवर झालेला परिणाम

                      कोविड १९आजाराचा शिक्षण व्यवस्थेवर झालेला परिणाम


        नमस्कार मंडळी.आज शिक्षण व्यवस्थेवर झालेला परिणाम हा कशाप्रकारे होतोय हे सांगण्याचा माझा अल्पसा प्रयत्न.

कोविड १९ अंगावर शहारे आणणारा आणि भितीने थरकाप उडवणारा रोग आहे.जणू माणसापासून माणूस तोडत आहे.कुटूंबापासून वेगळं करत आहे.स्पर्शातून येणारा हा रोग निसर्गाचा ओक्सिजनसुध्दा मनमुराद घेऊ नये म्हणून बंद दरवाज्याची सोय करून ठेवली आहे.जवळ जवळ सहा/ सात महिने झाले तरी हा रोग संपूर्ण जगात थैमान घालत आहे.

               रोजंदारीवर काम करणारे कितीतरी कुटुंब उपासमारीने आणि आर्थिक अडचणींने जीवन जगत आहेत.त्यातच आता सरकारने आदेश काढला आहे की, मुलांना ऑनलाईन  शिक्षण द्या असा शिक्षकांना आदेश दिला आहे.

              आता आली का पंचाईत? तसं बघायला गेलं तर असतो ओ सर्वांकडे स्मार्टफोन!पण मुलं खरंच फक्त शिक्षणासाठीच त्याचा वापर करतील का?गेम कॉमेडी आणि कार्टून मध्ये गुंतलेली असतात.आणि आई-वडिलांना मात्र अभ्यास करतोय म्हणून सांगतात.शिकलेले आई-वडील असतील तर ते लक्ष देतातही.पण....ज्यांनी कामात गुंतवून घेतलेलं असते त्यांचे काय?

म्हणजे पर्यायाने मुलं खोटं बोलायला शिकतात.आणि मग उद्याचे भविष्य खोट्याच्या आधारावर बघायचं का?

आता दुसरा मुद्दा असा की,ज्या घरात रोजंदारीला गेल्याशिवाय चूलही पेटत नाही आणि आपल्या सारखं आपली मुलं अडाणी राहायला नकोत म्हणून जीवाचा आटापिटा करून खाजगी शाळेत तर कुणी सरकारी शाळेत मुलांना दाखल केलंय.पण अंगठा बहाद्दर असल्यामुळे मुलांचा अभ्यास घेता येत नाही.हातातोंडाशी गाठ घालताना नाकिन ऊ यैतय.तिथं महागडा फोन घेऊन मुलांना ऑनलाईन शिक्षण कसं देणार? आणि मग शिकायची इच्छा असूनही ती बालकं वंचित राहणार का?हा ही मोठा प्रश्नच असतो.

     को्विड या आजाराने तर माणसं माणसांपासून दूर चाललीत.कुणी साधी चौकशीही करत नाहीत इतकं भयंकर वातावरण असताना आपले शिक्षक आरोग्य यंत्रणेला सहकार्य करण्याच्या हेतूने सर्व्हेला बाहेर पडलेत.जेव्हा ते सर्व्हे करून येतात तेव्हा कुणी त्यांना विचारलंच की,सर/मॅडम इतकी रिस्क घेऊन तुम्ही हे करताय याबद्दल तुम्हाला काय वाटतं? यावर ते शिक्षक जे उत्तर देतात ना?ते ऐकून पोटात कालवाकालव झाल्यावाचून राहत नाही.

काही शिक्षक म्हणतात, मुलांच्या चिवचिवाटावाचून वंचित राहिलेल्या भग्न शाळा बघून डोळ्यात पाणी येतं.जिथं मुलांच्या घोळक्यातून क्षणभर उसंत मिळायची नाही.ती वर्गातली खोली खायला उठते.आमची मुलं कधी येतील म्हणून खडू आणि फळा जणू विस्फारून डोळे दरवाजाकडे नजर लावून बसतात.अशावेळी जेव्हा आम्ही भागांमध्ये सर्व्हेला जातो ना तेव्हा निदान पाच/सहा चिमुरडी आम्हांला बघून आनंदाने जवळ येतात.माहिती घेतात आणि सर..... कधी होणार शाळा सुरू? असं विचारतात.तेव्हा भरल्या डोळ्यांनी आम्ही त्यांना समजावतो.कधी कधी तर त्यांच्या घरी जाऊन त्यांना अभ्यास सांगतो.दुसर्यादिवशी पुन्हा भेट देऊन दिलेला अभ्यास केलाय का हे बघतो.पण; हे सर्वच मुलांच्या बाबतीत होत नसतं.याचीही खंत असतेच 

कोविडने श्रीमंत कुटूंबाला घरच्या घरी सर्व साधने उपलब्ध असल्याने सर्व सुविधा मिळाल्या.पण मग या गरीब मुलांनी काय करावे? त्यांच्या पालकांच्या चेहर्यावरचे अपराधी भाव पाहिले की वाटतं,हा कोविड माणसाला माणसातून उठवण्यासाठी तर आला नसेल आणि आँनलाईन शिकविलेलं किती जणांच्या लक्षात राहतय; कारण,रोजची घोकंपट्टी घेऊन सुध्दा मुलं विसरायचीत आणि डिजिटल इंडिया च्या नावाखाली कुठं चाललंय मुलांचं शिक्षण? कसं घडेल उद्याची पिढी? आणि तरीही स्वच्छता होइल का प्रत्येक मनातल्या विषाणूंची की,लागण होईल सर्वाच्याच मनाला कोरोनाची......

सम्रुध्द भारतासाठी कशी शिकतील मुलं? भरमसाठ डोनेशन आणि फी च्या नावाखाली खाजगी क्लासेसच्या नावाखाली किती आर्थिक पिळवणूक होईल.मुलं शाळेतच वर्गात बसून शिकली, शिक्षकांना फेस टू फेस शंका निरसन करून घेऊ लागली तरच शिकतील नाहीतर कधी रेंज नाही कधी नेटवर्क नाही तर कधी लो ब्याटरी होऊन सारंच मुसळ केरात गेल्यासारखे होईल आणि याहून मोठं आर्थिक संकट कुठलं असेल की आताची मुलं उद्याची स्वप्न आहेत आणि कोविडने सर्वांना घराघरांत जखडून ठेवून भविष्यच अंधारमय करू पाहतय हे कोविड १९ ! 

                          सौ.मनिषा वराळे धरणगुत्ती