Thursday, December 31, 2020

आज दादांचा वाढदिवस

                   आज दादांचा वाढदिवस


बालपणापासून कष्ट आणि तडजोड यामुळे शिक्षण घेण्याची इच्छा पूर्ण केली.प्रत्येक टप्प्यावर नवा अनुभव घेऊन तावून सुलाखून निघालेले एक दिलदार व्यक्तिमत्व आहे डॉ.सुनिल दादा पाटील. साहित्य क्षेत्रातील अनेक मान्यवर आणि फक्त आपल्या भारतातच नाही तर परदेशातही अनेक जीवाभावाची माणसं जोडून स्नेह वृद्धिंगत करण्याचा प्रयत्न करणारं हे उमदं व्यक्तिमत्व आहे.

असं म्हणतात की,प्रत्येक यशस्वी पुरुषाच्या पाठीमागे एक स्त्री असते पण मला असं वाटतं की, जिथं जीवन जगण्यासाठी संजिवनी मिळते आणि माझ्यासारख्या सामान्य लेखनिकाच्या आयुष्यात परिस स्पर्श करून एक लुकलुकणारा तारा तयार करण्याचे काम दादांनी केले आहे.

फक्त पडद्याआड राहून मार्गदर्शन करणं हे वाटतं तितकं सोपं नसतं.पण दादा प्रत्येकाला प्रकाश झोतात आणून नामानिराळे राहतात हे गूण बघून वाटतं की, किती सहनशीलता आहे या माणसांत! म्हणजे बघा एका रोपट्याला लहानाचं मोठं करायचं तरी त्याचं श्रेय घ्यायचं नाही आणि एका वठलेल्या झाडाची निगा राखून त्याला जीवन दान द्यायचं तरीही कुठला मोठेपणा दाखवून द्यायचा नाही.

असं विविध प्रकारच्या गुणवत्ता असूनही साधं राहणं आणि लहानांपासून ते मोठ्यांपर्यंत सर्वांनाच सोबत घेऊन वावरणारं वात्स्ल्य देणारं हे व्यक्तिमत्व जे साहित्य क्षेत्रात बापमाणूस म्हणून ओळखला जातो.अशा या गुरूंचा आज वाढदिवस आहे आणि मला मनापासून वाटतं की, आनंद वाटणारे हात आपल्या सर्वांच्या पाठीवर असणारे हे दादा त्यांच्या अर्धांगिनी संजिवनी दिदी सोबत प्रिन्सरूपी बालकाला घडवत,नीलशी ध्येयवेड्या गप्पा मारत खूप खूप प्रगती करून माणुसकी जपत असाच जिव्हाळा वाढवत दिर्घायुष्य लाभो हीच ईश्वरचरणी प्रार्थना आहे.

          सौ.मनिषा पिंटू वराळे धरणगुत्ती

Saturday, December 19, 2020

एक अविस्मरणीय संध्याकाळ

                   एक अविस्मरणीय संध्याकाळ

काल खूप दिवसांनी अनेक जीवाभावाची  ज्येष्ठ साहित्यिक कुटूंबातील सदस्य यांना भेटण्याचा योग आला.निमित्त होतं ते प्राध्यापक प्रविणकुमार वैद्य सरांचा वाढदिवस.

           प्राध्यापक प्रविणकुमार वैद्य सर एक असं उमदं व्यक्तिमत्व जे तरूणाईला सुध्दा लाजवेल असं कर्तुत्व! एक मार्गदर्शक गुरु आणि सदा हसतमुख चेहरा घेऊन वावरणारं वात्स्ल्य देणारं ममतेने विचारपूस करून बापपण जपणारं हे आदर्श व्यक्तिमत्व आहे.

          असं म्हणतात की, प्रत्येक यशस्वी पुरुषाच्या पाठीमागे एक स्त्री असते.पण अम्रुतयोग असा की,प्राध्यापक प्रविणकुमार वैद्य यांनी त्यांच्या अर्धांगिनी प्राध्यापक सौ. वैद्य काकींच्या मागे असा तेजोमय साथ देणारा जीवनसाथी लाभला.ज्यांनी स्वत: आपल्या पत्नीला शिक्षण पूर्ण करून, त्यांना घरकामात मदत करून , एक नावाजलेली प्राध्यापिका बनवलं.

    डॉ.सुबोध दादा आणि फार्मसिस्ट प्रबोध दादा सारखी सेवाभाव जपणारी गुणी मुलं लाभली.जी पुर्वापार चालत आलेली सेवा बजावत आहेत.लक्ष्मीरुपाने प्रांजल वहिनी आल्या आणि घरची अन्नपूर्णा होऊन मुलीची उणिव भरून काढली.नातवंडाच्या बाललीलात रमताना घराचं गोकुळ अनुभवताना त्यांनी आपली लेखणी सुध्दा तितक्याच आत्मीयतेने जपली आहे.

जवळपास वीस एक पुस्तकांचे जनक,एक आदर्श व्यक्तिमत्व आणि साहित्य रत्न पुरस्काराने सन्मानित झालेल्या या आपल्या बापमाणसाला जीवन गौरव पुरस्काराने सन्मानित केले गेले तेव्हा अक्षरशः मन अभिमानाने फुलून आले.वयाची बहात्तरी पूर्ण होत असताना आजही ते कर्तव्य पार पाडत आहेत ते आपल्या सहचारिणीची सेवा तितक्यात आपुलकीने करत आहेत.अशा अनेक आठवणी जाग्या होतात आणि वेळेअभावी सारं काही सांगता येत नाही.तरीही साहित्य सेवा बजावत त्यात प्राविण्य मिळवणारा हा बाप माणूस मला आज खूप मोठा वाटला.

मंगेश सरांसारखे विचार सकारात्मक दृष्टिकोन ठेवून जगता यावे आणि सुर्यवंशी सरांसारखं हसत हसवत जीवनाचा आस्वाद घेता यावा.आवटी सरांसारखं वाणीतून अम्रुत ज्ञान मिळालं, अनेक जीवाभावाची ज्येष्ठ साहित्यिक त्यांचे विचार ऐकायला मिळाले.आणि हे सारं ज्यांच्यामुळे शक्य झाले ते म्हणजे कविता सागरचे डॉ सुनील दादा, संजिवनी दिदी,राज सर आणि रोझ दिदी ,पटेल सर आणि सर्वच दिग्गज साहित्यिक कुटूंबातील सदस्य यांच्या सहकार्याने!

अशीच विनंती देवा चरणी की, माझ्या या बापमाणसाला दिर्घायुष्य लाभो आणि त्यांची लेखणी अविरत चालू राहून असाच मार्गदर्शन आणि जीवनाचे सार समजावून सांगत धीर देणारा हात आपल्या सर्वांच्या पाठीवर राहो हीच सदिच्छा.जाता जाता पुन्हा एकदा वैद्य सरांना वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा.असा क्षण पुन्हा पुन्हा अनुभवायला मिळावा अशी विनंती.

सौ.मनिषा पिंटू वराळे धरणगुत्ती

Tuesday, December 15, 2020

ध्येय वेड्या मनाचे

 


कुणी कितीही झिडकारलं तरी काहीच फरक पडत नाही मला

कुणी कितीही टोचून बोललं,ध्येयहीन समजलं तरी काहीच वाटत नाही मला

मी ध्येयवेडी की मी आळशी काहीच समजून सांगायचं नाही मला

कारण हरवलेल्या संधीविषयी रडत बसायला आवडत नाही मला

माझी स्वप्नं, माझ्या आकांक्षा आणि माझी स्वप्नपूर्तता याविषयी काहीच बोलायचं नाही मला

कारण.... नशीब आणि बुध्दीमत्ता यावर भरोसाच नाही राहिला

फक्त दुनिया गोल आहे आणि सारीच आपली माणसं आहेत, एवढंच समजून माणुसकी जपायची आहे मला

नाती, मैत्री या पलिकडेही माणुसकी श्रेष्ठ असते हेच दाखवायचं आहे मला

कुणाला कितीही जीव लावला तरी शेवटी तुटावंच लागतं हेच समजून घ्यायचं आहे मला

स्वार्थी या दुनियेचा कावा माणुसकी पुढे हरवायचा आहे मला

खरंच म्हणून कितीही दूषणं दिली तरी कमजोर नाही व्हायचंय मला

माणुसकी जपत जपत , फुलं वाटत वाटत सुगंध जपायचा आहे मला

कोणत्याही उच्च पदस्थांशी स्पर्धा नाही करायची मला

माझ्याच संयमाचे ध्येय आता गाठायचे आहे मला.....

                      सौ.मनिषा पिंटू वराळे धरणगुत्ती

विश्वास

                विश्वास

चार अक्षरी शब्द आहे विश्वास वाचतानाही लय वाटतो खास

खेडवळ विचाराने सर्वांनाच जीव लावतो झक्कास

असो लहान,मोठा कुणीही पण आदर करतो हमखास

तरीही...हरतो,मरतो, धडपडतो तो हाच विश्वास

स्वप्नं म्हणू की सत्य हा नशिबाचाच ध्यास

संधी मिळते सोनं होतं तरीही राख नशिबास

खरंच, किती छोटा शब्द आहे ना विश्वास

कित्येकदा होतो घात तरीही ठेवतोच ना आपण विश्वास

करोत कुणीही कितीही आमचा दु:स्वास 

व्यवहार चातुर्यापासून दूर राहतो हा विश्वास

भावनिकता जपणार्याच्या गळ्याला लागतो फास

असा हा भावनांचा खेळ करून सोडतो विश्वास

                  सौ. मनिषा पिंटू वराळे धरणगुत्ती