साहित्यिक जीवनप्रवास
सर्वांना माझा सप्रेम नमस्कार! मी मनिषा पिंटू वराळे राहणार धरणगुत्ती तालुका शिरोळ येथील रहिवासी असून, मला सांगताना खूप आनंद होतो की, एक कवयित्री म्हणून आपल्याशी ओळख होण्यापूर्वी मी एक साधी ग्रुहिणी होते आणि खेड्यातील जीवनरीत अशी आहे की, इथे सासुरवाशिणींना मनमोकळेपणाने वागता येत नाही.मग घर म्हटलं की, भांड्याला भांडं लागतंच आणि आवाजही होतोच.
इथं सुध्दा एक गंमत असते ती म्हणजे घरचो सासूचे वर्चस्व इतकं की तिच्या मैत्रिणी सुध्दा (शेजार पाजारच्या) सुनेला बोलू शकतात आणि अशावेळी मन मोकळं करण्याचा एक अल्पसा प्रयत्न लेखणी मुळे झाला.
सुरूवातीला हे लिखाण घरच्यांना आवडलं नव्हतं.मग त्यांनी न्याय बसवला.नंतर ते साहित्यच जाळून टाकले आणि मन निराश झालं.असं म्हणतात की, संसार रथाची दोन चाके नवरा आणि बायको असतात.आणि जेव्हा यांची साथ एकमेकांना असते तेव्हा प्रत्येक संकटातून मार्ग निघत असतो.
अगदी तसाच अनुभव मला आला.माझे पती श्री.पिंटू वराळे यांनी मला खूप साथ दिली.त्यांनी त्यांना जमेल तसे वाचनालयातून मला पुस्तके आणून दिली आणि माझी वाचनाची आवड जपली.हळूहळू माझ्या लिखाणाला सुध्दा त्यांनीच प्रेरणा दिली.अनेक चिटोर्या कागदावर लिहून मी माझ्या भावना व्यक्त करत होते.तात्पूरते वाचन करून चांगलं लिहीलंस असं कौतुक सुध्दा होत होतं.नंतर नंतर शाळेतील शिक्षकांना मी माझं लिखाण दाखवत होते.त्यांनाही ते खूप आवडत होते.काहींना तर ती आपलीच कविता आहे असं वाटायचं.
मी गावातीलच उपकेंद्रात मदतनिसचे काम करत असल्याने काही समदू:खी महिला माझ्या सहवासात आल्या.आणि त्यांनी माझ्या या लिखाणाला पुस्तक रूपाने यायला पाहिजे या सदिच्छा सुध्दा व्यक्त केल्या.
असं म्हणतात की, निरपेक्ष भावनेने केलेली सेवा फळाला येते.माझ्या बाबतीत सुध्दा असंच झालं.मी मानधन तत्त्वावर काम करत असल्याने या तुटपुंज्या मानधनावर माझा स्वता:चा खर्चसुध्दा भागत नाही.तरीसुध्दा एक सेवाभाव मनात जपून मी आजपर्यंत माझं काम सुरू ठेवलेलं आहे.
नंतर नंतर मिस्टरांनी सकाळ न्यूज पेपर आणून दिले.त्यामधील एक न एक बातमी मी वाचत होते.एकदा बारीक चौकटीत 'नवोदित कवी लेखकांसाठी सुवर्ण संधी ' अशी छोटीशी जाहिरात व खाली फोन नंबर होता.
माझ्यासाठी ती खरंच एक सुवर्णसंधी ठरली.मी लगेच त्या नंबरला फोन केला.कवितासागरचे संचालक डॉ.सुनिल दादा पाटील यांचा तो नंबर होता.माहिती विचारल्यानंतर त्यांनी मला "सावित्रीच्या लेकी"या कार्यक्रमासाठी निमंत्रित केले.कार्यक्रम होता जयसिंगपूर नगरपालिकेमध्ये! आणि संयोजक होते श्री.संजय सुतार सर.
तसं बघायला गेलं तर धरणगुत्ती_जयसिंगपूर खूप जवळ आहे.पण तिथं पर्यंत जाणं सुध्दा माझ्यासाठी कष्टदायक ठरलं होतं.मी माझ्या नवर्याच्या प्रोत्साहनामुळे माझ्या मुलासोबत (प्रीतम) तिथं पोचले खरी पण.... नेमकं भेटायचं कुणाला? या विचारात असतानाच कार्यक्रमाचे नियोजन करणारी साधे सरळ व्यक्तिमत्व असणारी ती व्यक्ती ज्यांना मी सांगितलं की, मला डॉ.सुनिल दादा पाटील सरांना भेटायचं आहे.
सरांनी हो मीच ती व्यक्ती! असं सांगितलं आणि तिथंच ती व्यक्ती माझं श्रध्दास्थान बनली.मी माझ्या चिटोर्या असलेलं कवितेचं साहित्य त्यांना दाखवलं.आणि त्यांनी कशाप्रकारे सुटसुटीत मांडावं ते समजून सांगितले.
त्याआधी एक गोष्ट सांगावीशी वाटते की, संजिवनी दीदी आणि प्रिन्स गाडीवरून येताना त्यांना मी फोन केला होता आणि त्यांनी माझा फोन घेताना त्यांचा छोटासा अपघात झाला होता.तेव्हा ते ऐकून तर माझी भीतीने गाळण उडाली होती.पण सरांनी ते बरोबर ओळखलं होतं.तेव्हा ते म्हणाले की, फार काही नाही किरकोळ लागलं असेल काळजी करू नका आणि माझी पत्नी खूप समंजस आहे.तुम्ही तिची बेस्ट फ्रेंड व्हाल.सरांचा प्रत्येक शब्द खरा ठरला आहे.
त्यावेळी मी माझी"कन्यारत्न" नावाची कविता सादर केली.जिने मला आजपर्यंत बळ दिलंय.संजय सुतार सर, मंगेश कोळी सर,प्रा.प्रविणकुमार वैद्य सर, आबासाहेब सुर्यवंशी सर, डॉ.कुमार पाटील, मनोहर भोसले सर, विजय बेळंकी सर, शिवाजी केंद्रे सर, सचिन वसंत पाटील सर, वैशाली नायकवडी,मेघा उळागड्डे अशी अनेक नामवंत साहित्यिक भेटली.जिथं कोणी लहान मोठ्ठा नव्हता तर जे होते ते विचारांनी साहित्यांनी एक झाले होते.
त्यावेळी खरं तर या सार्यांच्या विचारांनी प्रभावित होऊन माझा अर्धाअधिक आत्मविश्वास परत मिळाला होता.सत्तर वर्षाचे युवक ज्या शिताफीने पायर्या चढून वर जात होते त्यांच्या मानाने मला दहा-पंधरा पायर्यासुध्दा धड चढता येत नव्हत्या.हे माझं दुर्दैव होतं.पण मानसिक बळ मिळाले आणि छोट्या प्रिन्सच्या गुढी भेटीने मला लिहीण्यास बळ दिले असं वाटतं.कारण लहान मुलांच्या निरागस बोलण्यात एक सत्य लपलेले असते जे मनाने बघितलं तर नक्कीच दिसतं असं मला वाटतं.
श्री.मंगेश विठ्ठल कोळी सर एक आदर्श शिक्षक एक समुपदेशक आणि व्यक्तीमत्व विकास दिवाळी अंकाचे संपादक असून त्यांच्या प्रत्येक साहित्यातून एक सकारात्मक ऊर्जा मिळते.मला खरंच खूप अभिमान वाटतो हे सांगताना की, मंगेश सरांचा यशाचा मार्ग हे पुस्तक वाचल्यानंतर एक प्रकारची सकारात्मक ऊर्जा प्रेरीत होते.आणि वाटतं की, जसं एखाद्या डॉ क्टरांकडे जशी अनेक रोगांवर विविध उपचारासाठी औषधोपचाराचा साठा असतो.
अगदी तसाच साठा मंगेश सरांच्या विचारातून मिळतो.अनेक खचलेल्या जीवांना उभारी देण्याचे काम सरांनी एका निष्णांत तज्ञ अभ्यासू आणि कष्टाची जोड देऊन केलेली आहे.संकटांना सामना करण्याचं मनोबल त्यांच्या साहित्यातून मिळते.एखादंच वाक्य असं सांगतील ज्याने आपल्या आयुष्यातील प्रश्न सुटतील.असे मनमिळावू, माणुसकी जपणारे आणि तरूणांची उमेद असणारे मंगेश कोळी सरांचे साहित्य आहे.जे खरंच जीवनाचा आनंद देते.यशाचा मार्ग सुचविते.हे नक्कीच!
असं म्हणतात की,घराचा कणा घराचं आडं असतं आणि कुटूंबाचा कणा कुटूंबातील म्हातारी माणसं असतात.जे वेळेनुसार सल्ला देतात.मार्गदर्शन करतात आणि घरातील एकोपा राखतात.पण माझ्यासाठी साहित्य विश्वातला कणा आहेत डॉ.सुनिल दादा पाटील! ज्यांनी अनेक नवोदित कवी लेखकांना प्रोत्साहन देत नावारूपाला तर आणलंच पण, ज्येष्ठ साहित्यिक सहकार्यांना सुध्दा ते विसरले नाहीत.त्यांचे वाढदिवस साजरा करून त्यांच्या जीवनात आनंद निर्माण केला.उतरत्या वयात आलेल्या या वडील माणसांना आनंदाचा क्षण पुन्हा मिळवून दिला.असे हे हरहुन्नरी सर्हदयी डॉ.सुनिल दादा पाटील आहेत.जे प्रत्येकाच्या चांगल्या वाईट क्षणी अगदी देवमाणूस होऊन पाठीशी उभे राहतात.
जगाच्या कानाकोपऱ्यात कविता सागरचे नाव मोठ्या अभिमानाने घेतले जाते.याहून दुसरा आनंद, समाधान ते कोणतं असेल बरं?
असेच सेवाभावी डॉ.आणि ज्येष्ठ साहित्यिक आहेत डॉ.व्यंकटेश जंबगी! ज्यांनी त्यांच्या जीवनात अनेक व्याधीग्रस्त रूग्णांवर उपचार करत आपली रूग्णसेवा इमानेइतबारे बजावली असेल.अशा जंबगी सरांनी एकाचवेळी पाच_पाच पुस्तक ंप्रकाशित करून त्यांच्यातला सर्हदयी माणसाचं दर्शन घडवून आणले आहे.
अगदी लहानांपासून ते मोठ्यांपर्यंत सगळ्यांनाच कलाटणी देण्याचं काम त्यांनी आपल्या साहित्यातून व्यक्त केले आहे.अनेक पुरस्काराने सन्मानित झालेले डॉ.जंबगीसर आपली वैद्यकीय सेवा मात्र विसरले नाहीत आणि म्हणूनच बीसीजी ते ईसीजी ही कलाकृती निर्माण करून वाचकांपर्यंत पोचवली.
यामधून त्यांनी मनुष्य जन्माचा निरोगी आराखडाच मांडलेला आहे असं म्हणावं लागेल.तसेच डॉ.श्रीकांत पाटील सर जे राष्ट्रपती पूरस्कारांनी सन्मानित तर आहेतच पण हाडाचे शिक्षक सुध्दा आहेत.त्यांनी अनेक विद्यार्थी घडवले.तसेच घडलेल्या विद्यार्थ्यांवर साहित्य लिहून न थांबता त्याची चित्रफीत तयार केली आहे.
नवोदितांना मार्गदर्शन व्हावे यासाठी नवोदितांनी काय वाचावं, काय लिहावं, कसं लिहायचं,कोणता विषय हाताळायचा याची बारीक सारीक माहिती त्यांनी"लिहू आनंदें" या साहित्यातून प्रकाशित केले आहे.ज्यामुळे असंख्य वाचकांना, लेखकांना, कवींना सर्वांनाच खूप मोठे बळ मिळते.अगदी आपल्या संग्रही ठेवावे आवर्जून वाचावे असे साहित्य म्हणजे"लिहू आनंदें" होय.
अशा अनेक नामवंत साहित्यिकांची भेट जिथे झाली ते ठिकाण आहे कवितासागरचे संचालक डॉक्टर सुनील दादा पाटील यांचे घर! माळेतील दोर्याप्रमाणे स्वत:अद्रुश्य राहून आपलं काम प्रामाणिकपणे करत सर्वांना एकत्र बांधण्याचं काम या कुटुंबातील प्रत्येक व्यक्ती करते.
जगावं तर रडावं का?लढू का नये आणि लढावं तर जिंकावं मग ते प्रेम, आपुलकी आणि जिव्हाळा जपून का जगू नये.प्रत्येकाच्या जीवनात आनंद पसरत माणुसकी जपत पडद्यामागे राहून काम करणारे हे दाम्पत्य खरंच एका सच्च्या साहित्यिकांसाठी थोर दैवत आहे असे मला वाटते.
म्हणूनच तर माझ्यासाठी मुद्रित शोधिका सौ.संजिवनी पाटील व डॉ.सुनिल दादा पाटील,श्री.आबासाहेब सुर्यवंशी सर,प्रा.प्रविणकुमार वैद्य सर,श्री.मंगेश कोळी सर, वासुदेव गुरूजी, डॉ.व्यंकटेश जंबगी सर,श्री.विजय बेळंकी सर,प्रा.शिवाजी केंद्रे सर आणि स्वर्गीय अशोक दादा पाटील सर अशा गुरूजन वर्गाचा आशिर्वाद आणि मार्गदर्शन लाभले.
ज्या नवोदितांना कुणी समजून घेण्यास वेळ देत नाहीत पण या कुटूंबातील प्रत्येक व्यक्ती महत्तवाचा असतो.मग ती कुणीही असो. डॉक्टर पाटील काका,शांता पाटील काकी यांनी तर खूप बळ दिले अगदी मनापासून दाद दिली आणि ही गोष्ट माझ्यासाठी लाखमोलाची आहे.
साहित्य चळवळीसाठी जिथे जिथे साहित्य संमेलन भरविण्यात आली आणि मला तिथं जाणं शक्य झाले तिथे तिथे मी आवर्जून उपस्थिती लावली आहे.मग ते शिरढोणचे साहित्य संमेलन असो किंवा शिरोळ चे साहित्य संमेलन असो किंवा इंगळीचे संमेलन असो.शक्य तेव्हा मी जाण्याचा प्रयत्न करत असते.मला सुनील दादा पाटील यांचा खूप अभिमान वाटतो की त्यांनी मला साहित्य क्षेत्रातील एक सदस्य केलं.संवाद ग्रामिण साहित्य संमेलन मध्ये कवी संमेलनाचे अध्यक्षपद सुध्दा मी बजावलं.दिवाळीअंकामध्ये अतिथी संपादक म्हणून श्री.मंगेश सरांनी मला सन्मानित केले आहे.
आता वाटतं की, आपल्या साहित्यिकांची संख्या वाढली पाहिजे.तशीच वाचकांनी ही वाचनाची आवड जपली पाहिजे.तरच वाचनसंस्कृती व साहित्यिक यांच्या सहकार्याने आपण देशाच्या विकासासाठी हातभार लावू शकतो.ज्यामध्ये लेखणी अव्वल ठरेल.
मला वाटतं की,प्रत्येकातच एक लेखक, कवी लपलेला असतो, म्हणून माणसांच्या मनात मैत्रीचा हात पुढे करून प्रत्येक गावात संमेलनाचे आयोजन केले पाहिजे.ती भरवल्याने वाचनसंस्कृती तर टिकेलच पण साहित्य निर्मिती सुध्दा होऊन नवविचारांचे आणि प्रगतीचे विचार होऊन देशाच्या विकासासाठी हातभार लागेल एवढं नक्की.
मी मला जे वाटलं ते सांगण्याचा/लिहीण्याचा प्रयत्न केला आहे आणि काही चुकीचे वाटले तर मोठ्या मनाने माफ करा ही विनंती.
सौ.मनिषा पिंटू वराळे धरणगुत्ती