Friday, June 17, 2022

खेड्यातील महील्यांच्या समस्या

१७/६/२०२2 

विषय— खेड्यातील महिलांच्या समस्या


हिरवीगार शेते आणि हिरवाईने नटलेल्या खेडेगावातील घरं टुमदार बंगला बांधून रहाणारे सधन शेतकरी आपली संस्कृती जपत आहेत.खेड्यात श्रीमंती मनाची खूप आहे.पण धनाची नाही.इथल्या बायका मोलमजुरी करून घरप्रपंचा चालवतात.

        भल्या पहाटे उठून अंगण झाडून स्वच्छ करतात.शेणघाण काढून जनावरांना चारा घालून धारा काढून, स्वयंपाक करून लेकरांना, घरातील ज्येष्ठांना न्याहरी वाढतात.धुणीभांडी करून रानात कामाला जातात.

     इथं म्हटलं तर खूप सुख समाधान आहे.रानातून येताना जळण काटूक, भाजीपाला आणता येतो आणि उदरनिर्वाह चालवता येतो.पण जर व्यसनी नवरा असेल तर साराच घोटाळा होतो.वानसामान आणायच्या ऐवजी दारूसाठी पैसा खर्च केला जातो आणि लेकरांबाळांना उपासमारी भोगावी लागते.

      कपडे मिळत नाहीत.खाणंपिणं व्यवस्थित नसल्याने अशक्तपणा येतो आणि अनेक आजारांना आमंत्रण दिलं जातं.आतातर बायकांना अनेक समस्या आहेत.साधी पोटदुखी कधी कॅन्सर होते कळतच नाही.

       गरिबीमुळे वेळेवर औषधं घेता येत नाहीत.लेकरांच्या शिक्षणासाठी खाजगी सावकाराकडून कर्ज काढून शिकवलं जातं एवढ्याचसाठी की, मी जे दू:ख भोगत आहे ते माझ्या लेकीला येवू नये.आणि तिला शहरात शिक्षणासाठी पाठवलं जातं.आईच ती तिला लेकरांची काळजी वाटणं स्वाभाविक आहे.पण तिची मुलं शिकून मोठे स्वप्न साकारण्याऐवजी प्रेमात पडून थिल्लरपणा करतात, तेव्हा तिच्या पायाखालची जमीन सरकते.

        इतका संघर्ष, इतका त्रास ज्या मुलांसाठी सोसला त्यांनाही जाणीव का नाही की आईने आपलं रक्त आटवून शिक्षण दिलंय ते स्वावलंबी बनविण्यासाठी.आणि आपण काय करत आहोत याची जाणीव का नसावी? नवर्याचा मार खाल्ला, सासू सासरे नणंद दीर जाऊ यांचा जाच सोसला, याचसाठी की आज ना उद्या आपली लेकरं शिकून शहाणी होतील आणि कष्टाचं चीज होईल.

बिचारी कर्तव्यासाठी जगताना हसणं विसरली होती.एवढंच नाही तर गुरांसारखं राबून हाडं झिजवली होती.

शिकलेली समजूतदार आई आज हरली होती.तिला समजून घेणारं कुणीच उरलं नव्हतं.

लग्नानंतर ती होणारा त्रास ना माहेरी सांगू शकली,ना तिचं मन जाणणारा नवरा भेटला....

तरीही ती जगत आहे हे ही दिवस जातील या एकाच आशेने.

किती घुसमट सोसायची तिनं, घराघरात आज हेच चित्र दिसत आहे.वरवर सुखावणारं खेड्यातील जीवन वास्तवात मात्र आत्महत्या आणि व्याभिचाराने बरबटलेले आहे.कधी मिळणार न्याय या आमच्या भगिनींना याच विचारात दिवस जात आहे.


सौ.मनिषा पिंटू वराळे धरणगुत्ती तालुका शिरोळ जिल्हा कोल्हापूर

No comments:

Post a Comment