Wednesday, April 28, 2021

गर्जा महाराष्ट्र माझा

                           गर्जा महाराष्ट्र माझा

हिरव्या निसर्गाच्या कुशीत लपलाय रानमेवा ताजा

मनापासूनी गर्जा तुम्ही जय जय महाराष्ट्र माझा//१//

डोंगर दर्या आणि कड्या कपारीतून स्वराज्यासाठी लढला राजा

छत्रपती शिवाजी महाराजांसारखा सन्माननीय तो राजा

परस्त्री मातेसमान वागवून राखली स्त्री जातीची लज्जा

मनापासुनी वंदन करते वीर शिवाजी राजा

मनापासूनी गर्जा तुम्ही जय जय महाराष्ट्र माझा //२//

स्वराज्य रक्षणासाठी जिजाऊंनी दिधला शिवबा राजा

इथेच घडले लेखक, कवी;इथेच सुचते चारोळी आणि कविता

गझलांच्या, गाण्याच्या मैफिलीत विसरून शीण तुम्ही जाता

अशा पावन भूमीत जन्मलो गातो महाराष्ट्र माझा

मनापासुनी गर्जा तुम्ही जय जय महाराष्ट्र माझा//३//

इथेच कर्मभूमी गाजली,फड कूस्त्यांचाही रंगला

इथेच तमाशा आणि कलापथकांनी रस्ता आणि चौक सजला

इथेच नाट्यगृहामुळे कित्येक कलाकार साकारला

गीत, संगिता मुळेच इथला रोमरोम होता शहारला

अशा गुणांनी महाराष्ट्र माझा जगात भारी ठरला

अभिमानाने कितीदा नमवीला माथा, गर्जा महाराष्ट्र माझा//४//

कोरोनाने जीव सार्यांचा काकुळतीला आला 

मास्क लावून हात धुवून सुरक्षित अंतर पाळा

सहकार्याने हे ही युद्ध जिंकूनी होऊ विजेता

मनापासूनी गर्जा तुम्ही जय जय महाराष्ट्र माझा//५//

          सौ.मनीषा पिंटू वराळे धरणगुत्ती जिल्हा कोल्हापूर









Sunday, April 4, 2021

कधी कधी वाटायचं

                        कधी कधी वाटायचं

कधी कधी वाटायचं तू येशील तेव्हा तुझ्याही डोळ्यांत मला ती अधिरता जाणवेल

तू येशील आणि माझा हात हातात घेशील

काय अन् किती बोलू असं म्हणशील

पण.... तू आलीस कोरड्या नजरेने

कुठेतरी डोळ्यातला ओलावा विसरून

बघतेस आजही!तसाच......कटाक्ष टाकतेस

मग मी ही माझ्याच परीने अर्थ काढत बसते

कारण आपली मराठी भाषा वळवेल तशीच वळते

मग वाटतं.... तू कर्तव्य दक्ष अधिकारी असतेस

चपराश्यात कशाला आणि का घूटमळतेस

का?करायची असेल तुलाही मैत्री माझ्याशी

तुलाही हवंय कुणीतर ओळख करून देईल तुझीच तुझ्याशी

तुला हसवणारं, तुला फुलवणारं तुला नवी उमेद देईल

आणि दोन मनाचं तेव्हाच एका स्वच्छ नात्यात रुपांतर होईल

तुला काही शिकवता शिकवता मीच एकदा एकाकी होईल

अन् तेव्हाच तर खरी माणुसकीची पारख होईल

              सौ.मनिषा पिंटू वराळे धरणगुत्ती जिल्हा कोल्हापूर

भातुकली

                        भातुकली

आज मन पुन्हा लहानपणीच्या आठवणीत रमते

भातुकलीच्या खेळातील राजारानी आठवते

कधी ती छोटीशी कुरबुर आणि लटका राग आठवते

तर कधी मैत्रिणींशी केलेला रुसवा राग साठवते

सारंच आज वेगळं आणि सत्य डोळ्यात पाणी दाटते

लहानपणीच्या दिवसांना आठवून ओठांवर हसू उमटते

आज संसारात रोजच नवी धावपळ असते

डब्यात काय, नाष्टा काय अशी आवडीनिवडी जपत राहते

नोकरी सांभाळताना तर त्रेधातिरपीठ उडत असते

सगळ्यांच्या वेळा सांभाळताना नाकीनऊ येत असते

अशीही सत्यातली भातुकली प्रत्येकीच्या नशिबी असते

आता लटका राग नसतो तर चिडचिड आणि टोमणे असते

वठारलेल्या डोळ्यांमधून तिरस्काराची नजर असते

कुत्सित बोलण्याने काळीज चिरत जात असते

आताची भातुकली खरंच खूप दमछाक करते

कर्तव्य आणि संस्कारांची ओझी ती मिरवत असते

कधी आईबापांच्या इभ्रतीसाठी तडजोड ती करत जगते

एक आई म्हणून जगताना ती खरंच रोज मरत असते

दोन शब्द प्रेमाचे ऐकण्यासाठी ती जीवाचा कान करत असते

अशी सत्यातली भातुकली खरंच किती परिक्षा घेते

      सौ.मनिषा पिंटू वराळे धरणगुत्ती जिल्हा कोल्हापूर