संजीवन ज्ञानाचा सागर
आयुष्यात अनेक माणसांशी संबंध आला.काही नाती आपुलकीने जपण्याचा प्रयत्न केला.काही नाती जीवाभावाने जपली.पण खरंच, कर्तव्य करत असताना एक पोकळी नेहमी राहिली ती म्हणजे सहकार्याची!
कर्तव्य करताना प्रत्येक नात्याला समजून घेत जगत राहिले.कधी बालपण करपलं आणि त्या नकळत्या वयात सहनशक्ती माझी सावली बनून राहीली.या सावलीने माझी इतकी साथ दिली की, जीवनाच्या प्रवासात जेव्हा शेवटच्या टप्प्यात पोचलो तेव्हा सुध्दा या सहनशक्तीने मला जीवनदान दिलं.निसर्गनियमांनुसार लग्न, संसार, मुलं आणि पुन्हा कर्तव्य ओघाने आलंच.
पण....माझ्यातलं मी पण जरा डोकावत राहिलं.कधी चिटोरा बनून तर कधी वहीतील प्रत्येक पानावर जीव ओतून लिहावं तसं झालं.वाचणारा तर डोळ्यांतून पाणी काढायचा किंवा कौतुकाचा वर्षाव करत बसायचा.
मुलांच्या जडणघडणीत पुन्हा हरवल्यानंतर शाळेतील पालक मिटींग मध्ये कधी कधी चार, दोन शब्द बोलून दाखवली आणि मग ते शब्द शिक्षकांना सुध्दा खूप आवडायचे.नंतर मुलं हायस्कूलला गेली आणि पुन्हा एकदा मला थांबावं लागलं.पण वाचनाचे वेड स्वस्थ बसू देत नव्हतं.कधी घरच्यांनी पेपर आणून दिला तर त्याचा फडशा पाडायची.इतकं अधाशीपणे वेड होतं वाचनाचं!
यातूनच एक सुवर्णसंधी मिळाली जी नवोदित कवी, लेखकांसाठी होती.जयसिंगपूर नगरपालिकेमध्ये 'सावित्रीच्या लेकी"! या कार्यक्रमात मी माझी पहिली कविता"कन्यारत्न" सादर केली.जी संजय सुतार सर आणि सुनील दादा यांच्या सहकार्याने मी सुरुवात केली होती.
तिथून मग शब्दकळा,परिमळ,पहाटपावलं आणि समग्र वाड्मय या कविता संग्रहांना पुस्तक रूपाने प्रसिध्द केले.आणि माझी स्वत:ची ओळख स्वत:शी झाली ती या साहित्य क्षेत्रातील मान्यवर आधारस्तंभ असलेल्या डॉ. सुनील दादा पाटील या थोर माणसांमुळे आणि त्यांच्या अर्धांगिनी संजिवनी दिदी यांच्या सहकार्याने.
असं वाटतं की, देवळात गेल्यावर जेवढं समाधान मिळते त्याहून कित्येक पटीने अधिक मानसिक आत्मबल यांच्या संपर्कात राहिल्याने मिळते.अजून एक गोष्ट अशी की, सुनील दादा ज्यांच्या ज्यांच्या संपर्कात आले त्यांच्या जीवनाला जणू परिस स्पर्श झाला असं मला वाटतं.कारण,हा साधा सुधा माणूस खूप दूरद्रुष्टीकोन ठेवणारा, सर्वांचं हीत जपणारा भावनिक कनवाळू माणूस आहे.आणि अशा या सच्च्या मनाच्या माणसाचे मन समुद्रासारखेच अथांग आहे.
माणसं जोडायचीतच पण ती अशा आपुलकीने की, ती पुढे जाऊन एक मोठं कुटुंब व्हावं.आणि त्या कुटूंबाचं एक विशाल वटवृक्ष झाला आहे ज्यामध्ये मोठं साहित्यिक जोडले गेले आहेत.इथं कुणी लहान मोठा नसतो ना गरीब श्रीमंत!
इथं सारी समान असतात.खरी मुळं ही कष्टांवर,गरीबींवर रूजल्यामुळे प्रत्येकजण यांचा (सुनील दादा) कुटुंब सदस्य असतो.आयुष्यात मोठं पद नाही मिळालं.मानसन्मान पैसा आडका याची कधी अपेक्षा नाही केली.पण......माणसाची माणुसकी,प्रेम, जिव्हाळा या गोष्टींची आस होती.आणि ती या संजीवन ज्ञान सागराच्या माध्यमातून मला मिळत गेले.
अखंड सागरातून एखाद्याच शिंपल्यात मोती सापडावा तसा हा मोती आमच्या सर्व साहित्यिकांना नशिबाने सापडला.आणि मला माझा विश्वास आहे की एक ना एक दिवस माझा हा ज्ञानसागर . मला नक्कीच, साहित्यातील सर्वोच्च स्थानावर पोचवण्यासाठी मदत करेल. कारण, बुडणार्याला काठीचा आधार तर असतोच , पण माझ्यासारख्या धापणारीला आजीवन , संजीवनच तर दिलंय ना माझ्या या ज्ञानमाऊलींनी कधी कधी जेव्हा खूप एकटेपण येतं. , आणि कोणताही आधार सावरायला नसतो ना , तेव्हा मला दादांचा चेहरा आठवतो .
त्यांचा हसरा चेहरा आणि आसवांनी गर्दी केलेले डोळे आठवतात.आणि तेव्हाच एक प्रिन्स रूपी आशावाद, भविष्य सांगावं तसं सहजगत्या बोलतो आणि जगण्याची उमेद येते.
वाटतं खूप प्रवास करायचा आहे. खूप वाचायचं आहे.खूप लिहायचे आहे.अगदी जगातल्या शेवटच्या कोपऱ्यात राहणा-या माणसाचं सुध्दा दू:ख हलकं करायचं आहे.पण...त्याआधी स्वताला सावरायचं आहे.या ज्ञानसागरातील एक शिंपलं म्हणून आजन्म जगायचं आहे.त्यासाठी या गुरुवर्यांची सदैव सोबत हवी आहे.
सौ.मनिषा पिंटू वराळे धरणगुत्ती
No comments:
Post a Comment