Tuesday, January 26, 2021

माझ्यातली तू

                    माझ्यातली तू

सहज बोलता बोलता समजलं की, आजही तू माझा विचार करतेस.पण संयमाने हे मान्य करायला टाळतेस.कारण, तुलाही माहीत आहे की, तुला सोडून मी दुसरा कोणताच विचार करणार नाही. तसं तुझं मत खरंच आहे म्हणा !  ‌‌‌     

    पण खरंच , तुला वाटतं की तू माझ्याशी न बोलण्याने किंवा तुझ्या व्यवहारी वागण्याने तुझ्यातल्या त्या निरागस हळव्या  मनाला तू जपलं नाहीस , आणि मी तुझ्या विचारांपासून दूर   राहिलेय हे तू सांगू शकतेस ?   तुला माहित आहे का ? आजही जेव्हा केव्हा तू थोडं जरी आजारी पडलीस किंवा   एखाद्या अडचणीत सापडलीस , तरी मनाने , तू माझ्या जवळ येतेस  भासांतून , स्वप्नातून , तु मला सांगण्याचा प्रयत्न करतेस , पण नाही गं ................  , पण ती समजच आता नाही उरली माझ्याकडे  ! 

       तुला तर माहीतच आहे की , प्रत्येक नातं  मी  मनापासून जपण्याचा प्रयत्न करत आलेय , आणि आजही मी तेच करतेय! पण खरंच गं ... फूल वाटणार्या हाताला कधी सुगंध लागलाच नाही, उलटं रक्तबंबाळ झाले  माझे हातही आणि मनही .. तेव्हा तूच तर येतेस मला हळूवार समजायला . तुझं ते येणं इतकं मोहक असतं  की , त्या क्षणाला मी माझा सारा ताण विसरुन जाते , इतकी  तुझी सवय  झालीय ! 

         तुला  वाटतं की , तुझं माझ्याशी न बोलणं , माझ्या प्रगतीसाठी चांगलं आहे . मी ध्येयवेडी  होऊन , यशाची अनेक शिखरे मिळवेन . पण .... वेडे तुला तरी माहिती आहे का, तू आजही प्रत्येक क्षणाला माझ्यासोबत असतेस. अगदी माझी जीवाभावाची सखी बनून  , तू माझा आधार बनतेस , असा आधार  जो कूणीही काढून घेऊ शकत नाही , अगदी तुसुध्दा !  

     तू आज एक आदर्श कार्य करत  आहेस , हे ऐकून तूझा खूप अभिमान वाटतो . उद्या तूझीच एखादी विद्यार्थिनी तुला भेटलं ,  तेव्हा तिचे यश बघून तुला जे समाधान मिळेल ना ते जगाच्या कोणत्याही पारितोषिकापेक्षा नक्कीच श्रेष्ठ असेल , आणि ते श्रेष्ठत्व माझ्या सखीचं आहे याचं  समाधान मला मिळेल,   असो , काळजी घे सुखी रहा याच . सदिच्छा !  आजच्या प्रजासत्ताक दिनाच्या !  

               सौ . मनिषा  पिंटू  वराळे .

No comments:

Post a Comment