Friday, January 1, 2021

गौरी

                             गौरी


गौरी ही आईवडीलांच एकुलतं एक अपत्य. सालस, मनमिळावू स्वभावाची गोड मूलगी.गौरी नावाप्रमाणेच गोरीपान. ध्येयवेडी आणि स्मितहास्याने सर्वांना आपलंसं करणारी ही मूलगी खरोखरच खूप कष्टाळू आहे. घरकाम करत शिक्षण पूर्ण केले.स्वावलंबी जीवन  हसतमुखाने कसं जगावं याचं हे जीवंत उदाहरणच म्हणावं लागेल.

                गौरी माझ्या मूलाच्याच वयाची! पण तिचा समंजसपणा पाहून वाटतं की, खरंच मूलं असावीत तर गौरीच्या  स्वभावाची.काहीही तक्रार नाही, परिस्थितीचं भान ठेवून वागणारी.अनेक कलागुणांनी संपन्न.आईबाबाला समजून घेणारी गौरी.

           आज तिनं मला एक आश्र्चर्याचा धक्काच दिला.आज व्हाट्सअप द्वारे प्रत्येकांनी शुभेच्छांचा वर्षाव करत असताना गौरी चक्क माझ्या कामावर जाण्याच्या वेळेला स्वत:चं काम करत रस्त्याला डोळे लावून माझी वाट बघत होती.माझ्या येण्याची चाहूल सुध्दा तिच्या मनात जपून ठेवली होती.

               पावलांचा आवाज तिने मनात जपला असावा.मी तिच्या  घराजवळ येताच तिने पटकन येऊन माझे पाय धरले आणि नवीन वर्षाच्या शुभेच्छा दिल्या.अगदी अचानक हे सारं बघून मला आश्र्चर्याचा धक्काच बसला.मनाला वेगळंच समाधान वाटलं.

 तिला खूप सार्या शुभेच्छा आणि धन्यवाद देऊन मी माझ्या कामावर आले.येताना मनात विचार आला की, माझ्यासारख्या मावशीचं काम करणाऱ्या बाईमध्ये या मुलीनं काय बघितलं जे आतापर्यंत माझ्या मुलांनी सुध्दा बघितलं नाही.

   खरंच शिक्षणापेक्षा नशिब मोठं असतं हे मनात घर करून राहिलेली मी ! माझ्यात मात्र तिनं शिक्षणच बघितलं असावं.आणि अजून एक..... कदाचित ती चमकसुध्दा जी सहसा कुणाला दिसत नाही.ती गौरीला दिसली असावी.

असो, गौरीने तिच्या आयुष्यात खूप यश मिळवावं आणि सुखी संपन्न आयुष्य जगावं अशीच माणुसकी जपावी याच तिला नवीन वर्षाच्या सुरुवातीला सदिच्छा......

सौ.मनिषा पिंटू वराळे धरणगुत्ती


No comments:

Post a Comment