Saturday, December 19, 2020

एक अविस्मरणीय संध्याकाळ

                   एक अविस्मरणीय संध्याकाळ

काल खूप दिवसांनी अनेक जीवाभावाची  ज्येष्ठ साहित्यिक कुटूंबातील सदस्य यांना भेटण्याचा योग आला.निमित्त होतं ते प्राध्यापक प्रविणकुमार वैद्य सरांचा वाढदिवस.

           प्राध्यापक प्रविणकुमार वैद्य सर एक असं उमदं व्यक्तिमत्व जे तरूणाईला सुध्दा लाजवेल असं कर्तुत्व! एक मार्गदर्शक गुरु आणि सदा हसतमुख चेहरा घेऊन वावरणारं वात्स्ल्य देणारं ममतेने विचारपूस करून बापपण जपणारं हे आदर्श व्यक्तिमत्व आहे.

          असं म्हणतात की, प्रत्येक यशस्वी पुरुषाच्या पाठीमागे एक स्त्री असते.पण अम्रुतयोग असा की,प्राध्यापक प्रविणकुमार वैद्य यांनी त्यांच्या अर्धांगिनी प्राध्यापक सौ. वैद्य काकींच्या मागे असा तेजोमय साथ देणारा जीवनसाथी लाभला.ज्यांनी स्वत: आपल्या पत्नीला शिक्षण पूर्ण करून, त्यांना घरकामात मदत करून , एक नावाजलेली प्राध्यापिका बनवलं.

    डॉ.सुबोध दादा आणि फार्मसिस्ट प्रबोध दादा सारखी सेवाभाव जपणारी गुणी मुलं लाभली.जी पुर्वापार चालत आलेली सेवा बजावत आहेत.लक्ष्मीरुपाने प्रांजल वहिनी आल्या आणि घरची अन्नपूर्णा होऊन मुलीची उणिव भरून काढली.नातवंडाच्या बाललीलात रमताना घराचं गोकुळ अनुभवताना त्यांनी आपली लेखणी सुध्दा तितक्याच आत्मीयतेने जपली आहे.

जवळपास वीस एक पुस्तकांचे जनक,एक आदर्श व्यक्तिमत्व आणि साहित्य रत्न पुरस्काराने सन्मानित झालेल्या या आपल्या बापमाणसाला जीवन गौरव पुरस्काराने सन्मानित केले गेले तेव्हा अक्षरशः मन अभिमानाने फुलून आले.वयाची बहात्तरी पूर्ण होत असताना आजही ते कर्तव्य पार पाडत आहेत ते आपल्या सहचारिणीची सेवा तितक्यात आपुलकीने करत आहेत.अशा अनेक आठवणी जाग्या होतात आणि वेळेअभावी सारं काही सांगता येत नाही.तरीही साहित्य सेवा बजावत त्यात प्राविण्य मिळवणारा हा बाप माणूस मला आज खूप मोठा वाटला.

मंगेश सरांसारखे विचार सकारात्मक दृष्टिकोन ठेवून जगता यावे आणि सुर्यवंशी सरांसारखं हसत हसवत जीवनाचा आस्वाद घेता यावा.आवटी सरांसारखं वाणीतून अम्रुत ज्ञान मिळालं, अनेक जीवाभावाची ज्येष्ठ साहित्यिक त्यांचे विचार ऐकायला मिळाले.आणि हे सारं ज्यांच्यामुळे शक्य झाले ते म्हणजे कविता सागरचे डॉ सुनील दादा, संजिवनी दिदी,राज सर आणि रोझ दिदी ,पटेल सर आणि सर्वच दिग्गज साहित्यिक कुटूंबातील सदस्य यांच्या सहकार्याने!

अशीच विनंती देवा चरणी की, माझ्या या बापमाणसाला दिर्घायुष्य लाभो आणि त्यांची लेखणी अविरत चालू राहून असाच मार्गदर्शन आणि जीवनाचे सार समजावून सांगत धीर देणारा हात आपल्या सर्वांच्या पाठीवर राहो हीच सदिच्छा.जाता जाता पुन्हा एकदा वैद्य सरांना वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा.असा क्षण पुन्हा पुन्हा अनुभवायला मिळावा अशी विनंती.

सौ.मनिषा पिंटू वराळे धरणगुत्ती

1 comment:

  1. आपण व्यक्त केलेल्या भावना खूप सूंदर आहेत. कालची सायंकाळ पुन्हा पुन्हा जीवनात यावी अशी मी परमेश्वर चरणी प्रार्थना करतो. मोठ्यांचे आशीर्वाद, मार्गदर्शन, शुभेच्छा संदेश, सर्वांचे आनंदी चेहरे न विसरता येणारे आहेत. सर्वांना पुढील जीवन सुखी, समृद्धी, आरोग्यदायी, दीर्घायुषी लाभो एवढीच ईश्वर चरणी प्रार्थना करतो.

    ReplyDelete