Thursday, October 15, 2020

कोरोनाने तोडली का हो माणुसकी?

           

                     कोरोनाने तोडली का हो माणुसकी ? 


         पुर्वी खेड्यांमध्ये घराघरांत आपुलकी आणि जिव्हाळा होता .  लांबलचक  पंगती बसत होत्या .  एखाद्या पदार्थ केला तर चार घरात पोचत होता .  

                  रात्रभर गप्पा रंगत होत्या . पहाटे कामांची लगबग सुरू होती .  शेतंशिवार आनंदात डोलत होती . सर्जा राजाची जोडी घुंगराच्या तालावर दौडत होती . चंपा , पारू , चंर्दी ,   ( म्हैशींची नावं)  ह्या रानामाळात चरायला जात होत्या . 


               सायंकाळी त्या घरचा रस्ता धरून थेट दावणीत जाऊन बसत होत्या .  आईने धारेसाठी केलेली लगबग आणि कासांडी भरून दूध घरात येत होतं .  खाऊन पिऊन माणसं सुखात राहत होती . 

                   पण ............    प्रगतीच्या नावाखाली नोकरी धंद्याच्या आशेने माणसं गाव सोडून शहरात गेली .  उच्च शिक्षणासाठी मुलांनी परदेश गाठला आणि गावाची गोडीच  संपून गेली . 

                    चार दोन जुनी जाणती मग गावच्या पारावर बसून जुन्या आठवणी काढून रमत होती . पाणावलेल्या डोळ्यांनी लेकरांची वाट पाहत होती आणि परस्पर लग्न करून आलेल्या  सुना , नातवंडे , बघण्यासाठी व्याकुळ झाली होती . पण ......... पोटच्या पोराला मात्र याची खातरच नव्हती .

   
                   यंत्रासारखं धावणारा आणि पैशापाठी लागणारा पोर , त्याला मायेची ऊब कितीही खूणावली तरी कर्तव्य म्हणून शे पाचशे रुपडे पाठवण्यापलिकडे तो काहीच तर करत नव्हता .  आणि हाच फरक जनरेशन गॅप म्हणून मित्रांमध्ये सांगत होता. अगदी तसाच जनरेशन गॅप निसर्ग सुध्दा करतोय असं वाटतं .  कारण ...........‌‌‌‌....

 
                      कारण , गेल्या मार्च पासून भारतात कोरोनान थैमान घातलेलं आहे.  आरोग्य यंत्रणा , आशा , अंगणवाडी सेविका , आणि शिक्षक  सुध्दा आपला जीव धोक्यात घालून सेवा बजावत आहेत . पण हा कोरोना जरा अजबच निघालाय . गरीब , श्रींमंत कोणताही भेद न करता तो उच्च , प्रतिष्ठीतांपासून ते मोलमजुरी करणार्या पर्यत सार्यानाच आपल्या विळख्यात घेत चाललाय . साधा  सर्दी , ताप , कणकण जरी झाली तरी प्रतिकार शक्ती कमी होऊन तो कोरोना रूग्ण म्हणून घोषित व्हायलाय .  

                    संपर्क टाळला  जातो . सार्यांच गोष्टी वेगळ्या ठेवाव्या लागतात .  माणूस माणसापासून दूर चाललाय .  फक्त आरोग्य कर्मचारी धाडसाने पुढे जाऊन सेवा बजावत  असतात .  तेव्हा अर्ध्याहून अधिक पिडीतांना आपण यातून बरे होऊ की नाही या काळजीने खचून आत्मविश्वास  गमावून प्रसंगी जीव सुध्दा गमवत आहेत . 

                    तर काही पिडीतांना माणसांचा तुसडेपणा ,  एकटेपणा देऊन जातोय . कोरोना  म्हणजे एक प्रकारे वाळीत टाकलेलं असावं  असा अनुभव तो रूग्ण आणि त्यांचे नातेवाईक घेत आहेत . आणि खरंच जगायचं कसं हा मोठा प्रश्न सतत भेडसावत आहे . 

                    आधीचा काळ किती सुखाचा होता . कुणी आजारी पडलं , चव बदलली तर घरचे सोडाच पण शेजारी पाजारी सुध्दा एखादा पदार्थ करून घेऊन यायचे . आणि चव लागतंय का बघ असं म्हणायचे . आणि आता ..............

       
                      बैलाला घालाव्यात तशा मुसक्या घालून , जो , तो , फिरत आहे . असं वाटतं , जणू त्या मूकप्राण्यांनी दिलेला आशिर्वादच असावा की , " जैसी करणी वैसी भरणी " . निसर्ग शेवटी सहन तरी किती करेल बरं  !   रसायनयुक्त मैला मिश्रीत पाणी थेट नदीत आणि नळांवाटे घराघरांत पोचतंय . प्ल्यास्टीकचा अतीवापर आणि स्वच्छतेचा अभाव या सार्याचाच दुष्परिणाम या कोरोनाला खतपाणी घालणाऱ्या आहेत . 


                     परदेशातून आलेला हा आजार माणसाला दूर करत आहे . चार माणसं एकत्र बोलू , बसू शकत नाहीत . एकमेकांच सांत्वन करू शकत नाहीत . आणि ज्या प्ल्यास्टीकने नद्या , गटारी , तलावं तुंबलीत त्याच प्ल्यास्टीकमध्ये कोरोनाने म्रुत झालेल्या व्यक्तीला गुंडाळून दहन केले जाते . ज्या घरांसाठी मुलांसाठी , कुटूंबासाठी आयुष्य झिजविले तीच आपली माणसं मयत व्यक्तीची दहनाची जबाबदारी घेत नाहीत . 

            
                     मग रेस्क्यु फोर्सच्या मदतीने दहन करण्यात येतं . हा कोणता न्याय ?    बापाची इस्टेट , पैसा , मालमत्ता  सारं काही पाहिजे पण बापाचा अंत्यविधी करावा इतकंही मन निर्मळ नसावं . तर , दुसरीकडे मोलमजुरी करून घरच्यांना सांभाळतो . आईबापात देव बघतो . तरीही , सुखाला गालबोट लागलेच आणि घरचा आधारवड हरपला . चुटकीसरशी अनंतात विलीन होतो . तेव्हा हे असं झालंच कसं झालंच कसं या  विचाराने कोलमडलेल्या तो मुलगा सैरभैर होतो . 


                      आपल्या बापाचे आकस्मिक निधन झालं हे त्याच्या मनाला चटका लावून जाते . भितीने त्याचा थरकाप उडतो . पूर्ण घराची जबाबदारी ज्या खंद्यावर असते तो खांदा बापासाठी हळवा होतो . कितीही समजावलं तरी त्याचं मन मानत नाही . 

                       हातातोंडाला आलेली पोरं आपल्या बापाची ही अवस्था बघून घाबरून जातात . या दवाखान्यातून त्या दवाखान्यात घेऊन जातात . सारेच रिपोर्ट चांगले आलेले असतात .  पण ......... पण त्याचं मन खचलेलं असतं . 


                         माझा बाप कालपर्यंत ठणठणीत होता . साधा तापच त्याला आला आणि माझा बाप निघून गेला . हे सत्यच त्याला पटत नव्हतं . तो आतल्या आत कुढत असतो . सावरणारे हात कुटूंबाशिवाय दुसरे नसतात . अशावेळी मित्र मंडळ आणि नातेवाईक सुध्दा पाठ फिरवतात . आपलीच माणसं परकी वाटत असतात . नव्हे तर ती तशीच वागून माणुसकी विसरत असतात . मग , खरंच मनापासून वाटत राहतं की , खरंच या कोरोनाने नात्यातली आपुलकी आणि माणसांतली माणुसकी तोडली काय हो ? 
 
                                   सौ. मनिषा पिंटू वराळे. धरणगुत्ती. 

             



1 comment:

  1. खूपच सुंदर लेख लिहिला आहे. अतिशय गंभीर वातावरण समाजात असताना आपला लेख वाचल्यामुळे नक्कीच हरवत चाललेली माणुसकी दिसून येते आहे. आपल्या पुढील लेखनास माझ्याकडून खूप खूप शुभेच्छा....

    ReplyDelete