Sunday, September 6, 2020

कोविड १९ आजाराचा शिक्षण व्यवस्थेवर झालेला परिणाम

                      कोविड १९आजाराचा शिक्षण व्यवस्थेवर झालेला परिणाम


        नमस्कार मंडळी.आज शिक्षण व्यवस्थेवर झालेला परिणाम हा कशाप्रकारे होतोय हे सांगण्याचा माझा अल्पसा प्रयत्न.

कोविड १९ अंगावर शहारे आणणारा आणि भितीने थरकाप उडवणारा रोग आहे.जणू माणसापासून माणूस तोडत आहे.कुटूंबापासून वेगळं करत आहे.स्पर्शातून येणारा हा रोग निसर्गाचा ओक्सिजनसुध्दा मनमुराद घेऊ नये म्हणून बंद दरवाज्याची सोय करून ठेवली आहे.जवळ जवळ सहा/ सात महिने झाले तरी हा रोग संपूर्ण जगात थैमान घालत आहे.

               रोजंदारीवर काम करणारे कितीतरी कुटुंब उपासमारीने आणि आर्थिक अडचणींने जीवन जगत आहेत.त्यातच आता सरकारने आदेश काढला आहे की, मुलांना ऑनलाईन  शिक्षण द्या असा शिक्षकांना आदेश दिला आहे.

              आता आली का पंचाईत? तसं बघायला गेलं तर असतो ओ सर्वांकडे स्मार्टफोन!पण मुलं खरंच फक्त शिक्षणासाठीच त्याचा वापर करतील का?गेम कॉमेडी आणि कार्टून मध्ये गुंतलेली असतात.आणि आई-वडिलांना मात्र अभ्यास करतोय म्हणून सांगतात.शिकलेले आई-वडील असतील तर ते लक्ष देतातही.पण....ज्यांनी कामात गुंतवून घेतलेलं असते त्यांचे काय?

म्हणजे पर्यायाने मुलं खोटं बोलायला शिकतात.आणि मग उद्याचे भविष्य खोट्याच्या आधारावर बघायचं का?

आता दुसरा मुद्दा असा की,ज्या घरात रोजंदारीला गेल्याशिवाय चूलही पेटत नाही आणि आपल्या सारखं आपली मुलं अडाणी राहायला नकोत म्हणून जीवाचा आटापिटा करून खाजगी शाळेत तर कुणी सरकारी शाळेत मुलांना दाखल केलंय.पण अंगठा बहाद्दर असल्यामुळे मुलांचा अभ्यास घेता येत नाही.हातातोंडाशी गाठ घालताना नाकिन ऊ यैतय.तिथं महागडा फोन घेऊन मुलांना ऑनलाईन शिक्षण कसं देणार? आणि मग शिकायची इच्छा असूनही ती बालकं वंचित राहणार का?हा ही मोठा प्रश्नच असतो.

     को्विड या आजाराने तर माणसं माणसांपासून दूर चाललीत.कुणी साधी चौकशीही करत नाहीत इतकं भयंकर वातावरण असताना आपले शिक्षक आरोग्य यंत्रणेला सहकार्य करण्याच्या हेतूने सर्व्हेला बाहेर पडलेत.जेव्हा ते सर्व्हे करून येतात तेव्हा कुणी त्यांना विचारलंच की,सर/मॅडम इतकी रिस्क घेऊन तुम्ही हे करताय याबद्दल तुम्हाला काय वाटतं? यावर ते शिक्षक जे उत्तर देतात ना?ते ऐकून पोटात कालवाकालव झाल्यावाचून राहत नाही.

काही शिक्षक म्हणतात, मुलांच्या चिवचिवाटावाचून वंचित राहिलेल्या भग्न शाळा बघून डोळ्यात पाणी येतं.जिथं मुलांच्या घोळक्यातून क्षणभर उसंत मिळायची नाही.ती वर्गातली खोली खायला उठते.आमची मुलं कधी येतील म्हणून खडू आणि फळा जणू विस्फारून डोळे दरवाजाकडे नजर लावून बसतात.अशावेळी जेव्हा आम्ही भागांमध्ये सर्व्हेला जातो ना तेव्हा निदान पाच/सहा चिमुरडी आम्हांला बघून आनंदाने जवळ येतात.माहिती घेतात आणि सर..... कधी होणार शाळा सुरू? असं विचारतात.तेव्हा भरल्या डोळ्यांनी आम्ही त्यांना समजावतो.कधी कधी तर त्यांच्या घरी जाऊन त्यांना अभ्यास सांगतो.दुसर्यादिवशी पुन्हा भेट देऊन दिलेला अभ्यास केलाय का हे बघतो.पण; हे सर्वच मुलांच्या बाबतीत होत नसतं.याचीही खंत असतेच 

कोविडने श्रीमंत कुटूंबाला घरच्या घरी सर्व साधने उपलब्ध असल्याने सर्व सुविधा मिळाल्या.पण मग या गरीब मुलांनी काय करावे? त्यांच्या पालकांच्या चेहर्यावरचे अपराधी भाव पाहिले की वाटतं,हा कोविड माणसाला माणसातून उठवण्यासाठी तर आला नसेल आणि आँनलाईन शिकविलेलं किती जणांच्या लक्षात राहतय; कारण,रोजची घोकंपट्टी घेऊन सुध्दा मुलं विसरायचीत आणि डिजिटल इंडिया च्या नावाखाली कुठं चाललंय मुलांचं शिक्षण? कसं घडेल उद्याची पिढी? आणि तरीही स्वच्छता होइल का प्रत्येक मनातल्या विषाणूंची की,लागण होईल सर्वाच्याच मनाला कोरोनाची......

सम्रुध्द भारतासाठी कशी शिकतील मुलं? भरमसाठ डोनेशन आणि फी च्या नावाखाली खाजगी क्लासेसच्या नावाखाली किती आर्थिक पिळवणूक होईल.मुलं शाळेतच वर्गात बसून शिकली, शिक्षकांना फेस टू फेस शंका निरसन करून घेऊ लागली तरच शिकतील नाहीतर कधी रेंज नाही कधी नेटवर्क नाही तर कधी लो ब्याटरी होऊन सारंच मुसळ केरात गेल्यासारखे होईल आणि याहून मोठं आर्थिक संकट कुठलं असेल की आताची मुलं उद्याची स्वप्न आहेत आणि कोविडने सर्वांना घराघरांत जखडून ठेवून भविष्यच अंधारमय करू पाहतय हे कोविड १९ ! 

                          सौ.मनिषा वराळे धरणगुत्ती





No comments:

Post a Comment